चीनची आक्रमकता पहाता भारत आणि अमेरिका यांनी एकत्र काम करावे !

अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांचे आवाहन !

अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनच्या आक्रमक कम्युनिस्ट पक्षाच्या समोर लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे, असे विधान अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौर्‍याच्या आधी करण्यात आलेल्या या विधानाला महत्त्व आले आहे.

राजा कृष्णमूर्ती एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले की, आपण भारत आणि प्रशांत (पॅसिफिक) क्षेत्रात सुरक्षाव्यवस्था कशी भक्कम करू शकतो, यावर चर्चा करणे आवश्यक आहे. आपण आपल्या शक्तीचा लाभ कसा उठवू शकतो, याचा विचार केला पाहिजे.

‘नाटो प्लस’चे भारताने सदस्य बनावे !

‘नाटो प्लस’ या ५ देशांच्या संघटनेमध्ये भारतानेही सहभागी व्हावी, असा प्रस्तावही राजा कृष्णमूर्ती यांनी सादर केला आहे. या संघटनेमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, जपान, इस्रायल आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे. जर भारत यात सहभागी झाला, तर या देशांकडे असलेली गोपनीय माहिती भारतालाही उपलब्ध होऊ शकते.