हिंदु धर्म आणि हिंदुत्‍व म्‍हणजेच खरी धर्मनिरपेक्षता !

१६ जून २०२३ या दिवशी गोव्‍यातील रामनाथ देवस्‍थान येथे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

ज्‍यामध्‍ये व्‍यावहारिक आणि पारमार्थिक या दोन्‍ही गोष्‍टींचा सुंदर समतोल राखून विचार केला जातोे, त्‍यालाच ‘धर्म’ असे म्‍हणतात !

आज धर्मनिरपेक्षतेच्‍या संदर्भात बरीच चर्चा होते. अल्‍पसंख्‍यांक नेता असो वा कुणीही निधर्मीवादी नेता असो, प्रत्‍येक जण ‘भारत धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र आहे’, असे म्‍हणतो; पण खरे पाहिल्‍यास ‘हिंदु धर्म आणि हिंदुत्‍व हेच खरे धर्मनिरपेक्ष आहेत’, याचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

श्री. दुर्गेश परुळकर

१. छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट विक्रमादित्‍य आणि चंद्रगुप्‍त मौर्य यांची शासनव्‍यवस्‍था हीच खरी धर्मनिरपेक्ष शासनपद्धत !

‘वर्ष १९९२ मध्‍ये भारताचे दिवंगत पंतप्रधान नरसिंहराव यांनी एक भाषण केले होते. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले होते, ‘धर्मनिरपेक्षतेच्‍या संदर्भात आपण पुष्‍कळ मते मांडली आहेत; परंतु कोणता राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि नाही, याचा निर्णय घेण्‍यासाठी आपल्‍या देशात कोणताही ठोस नियम किंवा लक्षणे, अशी ठरवली गेली नाहीत.’ वर्ष १९९२ नंतर आज बरीच वर्षे लोटली; परंतु कोणत्‍याही डाव्‍यांनी (साम्‍यवाद्यांनी) या विषयावर चर्चा करण्‍याचे धाडस केले नाही. सध्‍या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ ‘मुसलमान लोकांच्‍या बाजूनेच न्‍याय देणे आणि अल्‍पसंख्‍यांकांना डोक्‍यावर बसवून घेणे’, हा लावला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट विक्रमादित्‍य आणि चंद्रगुप्‍त मौर्य यांची शासनव्‍यवस्‍था ही धर्मनिरपेक्ष शासनपद्धतीची खरी उदाहरणे आहेत. धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ भगवान श्रीकृष्‍णाने गीतेतील पुढील श्‍लोकात सांगितला आहे.

ये यथा मां प्रपद्यन्‍ते तांस्‍तथैव भजाम्‍यहम् ।
मम वर्त्‍मानुवर्तन्‍ते मनुष्‍याः पार्थ सर्वशः ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ४, श्‍लोक ११

अर्थ :  जो जसा माझ्‍याशी व्‍यवहार करत असेल, त्‍याच प्रकारचा व्‍यवहार मी त्‍याच्‍या समवेत करीन. (ही धर्मनिरपेक्षता आहे.)

२. भारतात अल्‍पसंख्‍यांकांना सहानुभूती आणि हिंदूंचा धिक्‍कार करणे, हीच धर्मनिरपेक्षता !

२२ जुलै १९९४ या दिवशी ‘इंडिपेंडन्‍ट’ या वर्तमानपत्रात ‘इंडियन फेस नेटिव्‍ह आयर्न इन टांझानिया’ या मथळ्‍याखाली एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि टांझानियाने ‘टांझानिया हा देश केवळ टांझानियन लोकांचाच आहे’, असे घोषित केले होते. आता ‘हिंदुस्‍थान हा केवळ हिंदूंचाच आहे, तो कुणाच्‍या बापाचा नाही !’, ही घोषणा ज्‍या लोकांना पटत नाही, ते टांझानियाच्‍या या घोषणेच्‍या विरोधात काही बोलले नाहीत. समाजवादी विचारसरणीने राष्‍ट्रवादाला सरळ धुडकावूनच लावले होते. धार्मिक निरपेक्षतेचा विचार समोर आला, तेव्‍हा धर्माच्‍या नावावर होणार्‍या लढाया थांबवण्‍याचा प्रयत्न केला असता, तर ते योग्‍य होते; परंतु धर्मनिरपेक्षतेचा अर्थ ‘केवळ अल्‍पसंख्‍यांक विशेषत: मुसलमान समाजाला संपूर्ण सहानुभूती दाखवणे आणि बहुसंख्‍य समाज, म्‍हणजेच हिंदूंचा सरसकट धिक्‍कार करत रहाणे’, असा प्रचलित झाला आहे. अशा प्रकारे जगात कोणत्‍याही राष्‍ट्राने स्‍वत:ला ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’ म्‍हणून घोषित केले नाही; परंतु हिंदुस्‍थान ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’ आहे, असे आपल्‍या शासनकर्त्‍यांनी घोषित केले.

३. सर्व जगाचे हित चिंतणारा हिंदु धर्म असहिष्‍णु कसा ? 

वास्‍तविक जगात हिंदु धर्म हा सर्वांत श्रेष्‍ठ धर्म आहे. हिंदु धर्माने सृष्‍टीच्‍या चराचरात ईश्‍वराच्‍या अस्‍तित्‍वाची अनुभूती दिली आहे आणि आपले वेद म्‍हणतात,

‘सर्वेऽत्र सुखिनः सन्‍तु सर्वे सन्‍तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्‍यन्‍तु मा कश्‍चिद़् दुःखमाप्‍नुयात् ॥

अर्थ : सर्व मानवजातीला आरोग्‍यपूर्ण जीवन प्राप्‍त होवो, जगातील सर्व मानवजातीचे कल्‍याण होईल, असे वातावरण असावे, सर्वांच्‍या जीवनातील दु:ख नष्‍ट होवो.’

अशी प्रार्थना करणारा हिंदु धर्म असहिष्‍णु होऊच शकत नाही. तरीही ‘हिंदु धर्म असहिष्‍णु आहे’, असे म्‍हटले जाते. वास्‍तविक हिंदु धर्माने संपूर्ण मानवजातीला सुसंस्‍कृत, सुखी, न्‍यायनिष्‍ठ, सत्‍यनिष्‍ठ, प्रतिकारनिष्‍ठ, तत्त्वनिष्‍ठ, नीतीनिष्‍ठ बनवण्‍याची प्रतिज्ञा केली आहे; म्‍हणून हिंदु धर्मच धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ आहे किंवा धर्मनिरपेक्षतेचे दुसरे नाव म्‍हणजे ‘हिंदुत्‍व’ आहे.

४. हिंदुस्‍थानात रहाणारे ते सर्व हिंदू ! 

हिमालयापासून ते इंदु सरोवर, म्‍हणजेच हिंदी महासागर (ज्‍याला ‘हिंदु महासागर’ म्‍हणणे आपल्‍याला आवडेल) यांच्‍यामधील जी भूमी आहे, तिला ‘देवनिर्मित भूमी’ असे म्‍हटले आहे आणि त्‍याचे नाव ‘हिंदु’ ठेवले आहे; कारण हिमालयाचे पहिले अक्षर ‘हि’ आणि इंदु सरोवर या शब्‍दातील दुसरे अक्षर ‘न्‍दु’ या दोन अक्षरांनी मिळून हिंदु हा शब्‍द सिद्ध झाला आहे आणि तेच भूमीचे नाव आहे.

ज्‍या वेळी आपण मुंबईत रहातो, त्‍या वेळी आपण ‘मुंबईकर’; गोव्‍यात रहातो, त्‍या वेळी गोवेकर असतो, तर हिंदु भूमीवर रहाणारा प्रत्‍येक व्‍यक्‍ती हिंदु आहे. या भूमीवर जो हिंदु धर्म अवतरित झाला आहे, त्‍यामुळे या देशाचे नाव ‘हिंदुस्‍थान’ असे आहे. हा विचार आपल्‍या संस्‍कृत ग्रंथात आहे. ‘बर्नाड जोसेफ’ यांनी संस्‍कृत ग्रंथांचा अभ्‍यास केला आणि ‘नॅशनॅलिटी नेचर अँड प्रॉब्‍लेमस्’ या ग्रंथातील पान क्रमांक २३० वर त्‍यांनी लिहिले आहे, ‘हिंदु राष्‍ट्राची भौगोलिक एकता ही जात, पंथ, भाषा यांच्‍याशी निगडीत नसल्‍याने सर्व भारतीय लोकांच्‍या मनात राष्‍ट्राविषयी वेगळी प्रेमभावना निर्माण करण्‍याची आवश्‍यकता नाही. अगदी प्राचीन काळापासून त्‍यांच्‍यामध्‍ये राष्‍ट्रभक्‍तीची भावना आहे.’

संस्‍कृत साहित्‍यात असे लिहिले आहे, ‘मनुष्‍य जन्‍म घेऊन त्‍याचे सार्थक करण्‍यासाठी हिंदुस्‍थान ही एकमेव पवित्र भूमी आहे.’ हिंदु समाजाच्‍या दृष्‍टीने ‘हिंदुत्‍व हे एक राष्‍ट्रभक्‍तीचे तत्त्व’ आहे आणि त्‍यावर त्‍यांची अतूट श्रद्धा आहे. हिंदु समाज आपल्‍या देशाला स्‍वर्गाहून अधिक पवित्र मानतो. आपल्‍या या पवित्र भावनेला सत्‍यस्‍वरूप देण्‍यासाठी त्‍यांनी देशभरातील प्रवासाला ‘यात्रा’ असे नाव दिले आहे. भारतियांंच्‍या सामाजिक जीवनाचे हे वैशिष्‍ट्य आहे की, ते आपल्‍या देशाचा गौरव करून ते त्‍याची पूजा करतात; म्‍हणूनच मी म्‍हणतो, ‘धर्मनिरपेक्षतेचा दुसरा अर्थ ‘हिंदुत्‍व’ असाच आहे.’

५. मार्क ट्‍वेनच्‍या मते हिंदुस्‍थान हा संपूर्ण मानवजातीचा आधार !

माजी अमेरिकी राजदूत ‘ब्‍लॅकवेल’ यांनी ‘एशियन एज’ या वर्तमानपत्रात एक लेख लिहिला होता. त्‍या लेखात अमेरिकन लेखक मार्क ट्‍वेन हा हिंदुस्‍थानाविषयी काय म्‍हणतो, ते लिहिले होते. मार्क ट्‍वेन म्‍हणतो, ‘हिंदुस्‍थान हा संपूर्ण मानवजातीचा आधार आहे. हिंदुस्‍थान हा सुसंस्‍कृतपणे वागणार्‍या आणि बोलणार्‍या मानवांची जन्‍मभूमी आहे. हिंदुस्‍थान हा मानवाच्‍या इतिहासाची माता आहे. हिंदुस्‍थान हा रामायण, महाभारत इत्‍यादींच्‍या महाकथा आणि दंतकथा यांची आजी आहे. हिंदुस्‍थान हा देश सुसंस्‍कृत परंपरांची पणजी आहे.’ त्‍यामुळे केवळ ‘हिंदुत्‍वच धर्मनिरपेक्ष’ आहे.

६. हिंदु धर्माविषयी पाश्‍चात्त्य विद्वानांची एकांगी समीक्षा !

धर्म हा समीक्षेचा विषय नाही, तरीही १८ व्‍या शतकात ‘लेसिंग फेर्डर’ याने पाश्‍चात्त्य देशात धर्माची ऐतिहासिक समीक्षा करण्‍यास आरंभ केला. त्‍याने ‘एज्‍युकेशन आणि ह्युमन रेस’ या पुस्‍तकामध्‍ये ख्रिस्‍ती आणि यहुदी धर्माची समीक्षा केली आहे. इंग्‍लंडमध्‍ये स्‍पेंसर याने धर्माची चर्चा करण्‍यास आरंभ केला आणि विल्‍यम जोन्‍स याने भारतीय धर्माची समीक्षा करण्‍यास आरंभ केला. त्‍यानंतर १८ व्‍या शतकामध्‍ये मॅक्‍समूलर, झिमर आणि हॉकिंग्‍ज् या विद्वानांनीही भारतीय संस्‍कृती अन् हिंदु धर्म यांवर चर्चा केली आहे. त्‍यांच्‍या आधी वॉलटेअर, थॉमसन, पामर, कार्ले इत्‍यादी पाश्‍चात्त्य विद्वानांनीही हिंदु धर्माची समीक्षा केली आहे. पाश्‍चात्त्य विद्वानांनी केलेली हिंदु धर्माची समीक्षा ही संपूर्णपणे एकांगी आहे; कारण मानवी जीवनातील धर्माचे महत्त्व त्‍यांच्‍या लक्षातच आलेले नाही. मानवी जीवनात धर्माची नितांत आवश्‍यकता आहे. धर्म ही एक सामाजिक शक्‍ती आहे. या सर्व गोष्‍टींकडे या सर्व विद्वानांनी (?) दुर्लक्ष केले. त्‍यांनी धर्मातील बाधक गोष्‍टी, आभास, अज्ञान आणि वंचना या सर्व गोष्‍टी उघडकीस आणल्‍या, हे योग्‍य आहे; परंतु त्‍यांच्‍याकडून केली गेलेली धर्माची समीक्षा ही एकांगी अन् मूळ धर्मावरच आघात करणारी आहे. वॉलटेअर म्‍हणतो, ‘धर्म हा १०-१२ दुष्‍ट प्रवृत्तीच्‍या लोकांनी एकत्र येऊन समाजाला लुटण्‍यासाठी बनवलेला नियम आहे.’

७. प.पू. पांडुरंगशास्‍त्री आठवले यांच्‍या धर्माच्‍या व्‍याख्‍येला आव्‍हान म्‍हणूनस्‍वीकारण्‍यास पाश्‍चात्त्य विद्वानांचा नकार !

ज्‍या वेळी आपण धर्माच्‍या संदर्भात चर्चा करतो, त्‍या वेळी डावे लोक धर्माची हीच व्‍याख्‍या आपल्‍या समोर ठेवतात. ‘ह्यूम’ याने लिहिलेल्‍या ‘ह्यूूम नॅशनल हिस्‍ट्री ऑफ रिलिजन’ या पुस्‍तकामध्‍ये ‘धर्म हे वेड्या माणसांचे स्‍वप्‍न आहे’, अशा प्रकारे त्‍याने धर्माची घोर निंदाच केली आहे. यावर प.पू. पांडुरंगशास्‍त्री आठवले म्‍हणतात, ‘‘मानवाच्‍या विशिष्‍ट हितसंबंधाचे रक्षण करणारी धर्म ही एक सामाजिक शक्‍ती आहे. ज्‍याची या पाश्‍चात्त्य विद्वानांनी कल्‍पनाच केलेली नाही. धर्माचे विचार चुकीचे आहेत, असे म्‍हटल्‍याने धर्मसंस्‍था नष्‍ट होत नसते. जर धर्मसंस्‍थेला संपवायचे असेल, तर प्रथम त्‍याची उपयुक्‍तता नष्‍ट केली पाहिजे. या लोकांमध्‍ये धाडस असेल, तर त्‍यांनी धर्माची उपयुक्‍तता नष्‍ट करून दाखवावी.’’ प.पू. पांडुरंगशास्‍त्रींनी केलेले हे आव्‍हान कुणीही स्‍वीकारले नाही, यातच आपला विजय आहे. निश्‍चितच धर्मभावना ही आकांक्षा, श्रद्धा, भक्‍ती आणि प्रीती या विषयांवर आधारित आहे; परंतु यावर मूलत: स्‍पष्‍ट-अस्‍पष्‍ट आणि व्‍यवस्‍थित-अव्‍यवस्‍थित या दृष्‍टीने बौद्धीक विचार होणे आवश्‍यक आहे. ‘ज्‍यामध्‍ये व्‍यावहारिक आणि पारमार्थिक या दोन्‍ही गोष्‍टींचा सुंदर समतोल राखून विचार केला जातोे, त्‍यालाच ‘धर्म’ असे म्‍हणतात.’

८. हिंदु धर्म अपौरुषेेय असल्‍याने तो नष्‍ट करणे अशक्‍य !

व्‍यावहारिक आणि आध्‍यात्मिक जीवन हे दोन मानवी जीवनाचे महत्त्वाचे पैलू आहेत. पाश्‍चात्त्य विद्वान ‘व्‍यावहारिक आणि पारमार्थिक जीवन वेगवेगळे आहे’, असे मानतात; परंतु भारतीय संस्‍कृतीने व्‍यावहारिक अन् पारमार्थिक जीवन वेगळे केलेले नाही. आज वैदिक धर्माच्‍या गुण-दोषांचे विवेचन केले जाते, हे योग्‍य नाही. न्‍यायाधीश वुड्रोप यांनी ‘इंडिया सिव्‍हीलाईज्‍ड् ?’ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यात ते म्‍हणतात, ‘वैदिक धर्म नष्‍ट होण्‍याचे कारण धर्मात असणारे दोष नसून खरा दोष हिंदूंचा आहे. त्‍यांनी या धर्माला नीट सांभाळले नाही. धर्म सांभाळणे, हे हिंदूंचेच दायित्‍व आहे आणि हिंदु किंवा वैदिक धर्म हा मानवनिर्मित धर्म नाही.’ कोणतीही व्‍यक्‍ती आपल्‍या धर्माची संस्‍थापक नाही. हिंदु धर्म हा अपौरुषेय आहे, हेच आपल्‍या हिंदु धर्माचे वैशिष्‍ट्य आहे. त्‍यामुळे कुणीही हिंदु धर्म नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न केला, तरीही तो नष्‍ट होणार नाही. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्‍हटले आहे, ‘प्रलयानंतर आणि प्रलयापूर्वी जो धर्म आहे, तोच ‘हिंदु धर्म’ आहे. त्‍याला नष्‍ट करणे, हे कुणालाही शक्‍य नाही.

९. मानवजात टिकून रहाण्‍यासाठी हिंदु धर्म टिकणे आवश्‍यक ! 

हिंदु धर्माची व्‍याख्‍या आणि वैशिष्‍ट्य असे आहे, ‘आहार, निद्रा, भय, मैथुन इत्‍यादी सर्व गुण आपल्‍याला प्राण्‍यांमध्‍येही दिसून येतात. धर्मामुळेच मनुष्‍य हा सर्व प्राण्‍यांपेक्षा श्रेष्‍ठ आहे. मनुष्‍याने जर धर्माचा त्‍याग केला, तर मनुष्‍य आणि पशू यांच्‍यात भेदच रहाणार नाही.’ स्‍वार्थाविना स्‍वातंत्र्य, संघर्षाविना विकास, सत्ताधिष्‍ठित न्‍याय आणि प्रसन्‍नतायुक्‍त आरोग्‍य, हेच मनुष्‍य जीवनाचे ध्‍येय आहे. या विचारांवर आधारित समाजव्‍यवस्‍था मानवी समाजाची प्रगती निश्‍चितच करू शकते; म्‍हणून हिंदु धर्म किंवा हिंदुत्‍व हीच धर्मनिरपेक्षता आहे. हिंदु संस्‍कृती नष्‍ट होणे, हे संपूर्ण मानवजातीच्‍या जीवनासाठी हिताचे नाही. हिंदु धर्म जिवंत राहिला, तरच मानव जात टिकून राहील, नाहीतर संपूर्ण जगात हाहाःकार माजेल. हिंदुत्‍वावर आधारित धर्मनिरपेक्षता जगाला अमृतवर्षाव करून पोषित करते, तर डाव्‍या विचारांवर आधारित असंतुलित धर्मनिरपेक्षता संपूर्ण जगाला नष्‍ट करील.’

– श्री. दुर्गेश परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली.