छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित कार्य करून त्‍यांचे मावळे होऊया ! – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

विरार येथे श्रीमंतयोगी प्रतिष्‍ठानच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्‍याभिषेक सोहळा दिन पार पडला !

व्‍याख्‍यानाला उपस्‍थित शिवप्रेमी

विरार – महाराष्‍ट्रात मोगलांचे राज्‍य असतांना अतिशय बिकट परिस्‍थितीतही छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्‍यांना संघटित करून मोगलांशी निकराचा संघर्ष केला. असामान्‍य शौर्य आणि स्‍वाभिमानी बाण्‍याने त्‍यांनी गोहत्‍या आणि धर्मांतर यांवर वचक बसवला. पाच मोगली पातशाह्यांना गाडून पुढे त्‍यांनी स्‍वराज्‍याच्‍या रूपात आदर्श राज्‍य उभारले. त्‍याच महाराष्‍ट्रात आज गोहत्‍या, धर्मांतर, लव्‍ह जिहाद आणि हिंदूंच्‍या हत्‍या यांचे भीषण वास्‍तव आहे. हे रोखण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण अंगीकारून त्‍यांचे कार्य केले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. ‘महाराजांना अपेक्षित असे कार्य करून आपण त्‍यांचे मावळे होऊया’, असे आवाहन श्री. पुजारे यांनी येथे केले.

विरार येथील श्रीमंतयोगी प्रतिष्‍ठान यांच्‍या वतीने ४ जून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्‍याभिषेक सोहळा साजरा करण्‍यात आला. या वेळी आयोजित ‘शिवचरित्र’ व्‍याख्‍यानात ते बोलत होते.

स्‍वसंरक्षणाची आवश्‍यकता सोदाहरण विशद !

व्‍याख्‍यानातून श्री. पुजारे यांनी महाराजांच्‍या जीवनातील विविध प्रसंग श्रोत्‍यांसमोर मांडले. तसेच ‘सध्‍या समाजातील विविध जिहादी समस्‍यांना सामोरे जाण्‍यासाठी स्‍वरक्षण प्रशिक्षण प्रत्‍येकालाच कसे आवश्‍यक आहे ?’, हे सध्‍याच्‍या लव्‍ह जिहाद आणि हिंदूंच्‍या हत्‍यांच्‍या उदाहरणांसहित सांगितले.

सकाळी महाराजांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्‍यानंतर दुचाकी फेरी काढण्‍यात आली. सायंकाळी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रतिष्‍ठानच्‍या वतीने श्री. हेमंत पुजारे यांचा पुष्‍पगुच्‍छ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. श्रीमंत योगी प्रतिष्‍ठानच्‍या माध्‍यमातून अध्‍यक्ष श्री. सागर बाचरे यांच्‍या पुढाकाराने शिवचरित्र समाजात पोचवण्‍याचे कार्य चालू आहे.

प्रतिसाद – महिलांसाठी स्‍वरंक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्‍याची मागणी करण्‍यात आली.