निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण मंडळाचे काम हे पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन ! – लेखक धीरज वाटेकर

धीरज वाटेकर

राळेगणसिद्धी – निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे काम हे पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन आहे. समाज प्रबोधनाची ही चळवळ आपण सर्वांनी जपलेली आहे. ती संपणारी नाही. काळानुसार प्रबोधनाची सूत्रे पालटतात; पण आवश्यकता संपत नाही. सध्याच्या काळातील प्रबोधन चळवळीचे एक प्रमुख सूत्र पर्यावरण पूरक जनजागृतीचे आहे. आपले पर्यावरण मंडळ या पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन म्हणून गेली २ दशके कार्यरत आहे, असे वक्तव्य येथील पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते, तथा लेखक धीरज वाटेकर यांनी केले.

मंडळाच्या जागतिक पर्यावरणदिन, संस्थापक-अध्यक्ष स्व.‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे जयंतीदिन आणि नूतन कार्यकारिणी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रचिकित्सक ‘पद्मश्री’ मा. डॉ. विकास महात्मे, शासनाच्या ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने सन्मानित डॉ. सुधा कांकरिया आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्य पर्यावरण कार्यशाळेला २४ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अण्णा हजारे या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत.

धीरज वाटेकर पुढे म्हणाले,

१. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष आबासाहेब म्हणायचे, ‘वृक्षसंवर्धनाचे आपले काम जाणीव-जागृतीचे आहे.’ रेल्वेच्या डब्यासारखे लांबच लांब महाराष्ट्रभर पसरलेल्या या सामाजिक कामस्वरूप रेल्वेच्या डब्यात आजवर अनेक प्रवासी येऊन बसले. काही उतरले; पण ना हा डबा थांबला ना हे काम! काही प्रवासी पुन्हा नव्याने बसले. अजूनही काही नव्याने येतील.

२. आबासाहेबांना श्रद्धांजली वहातांना आदरणीय अण्णा म्हणाले होते, ‘पर्यावरणाच्या समस्येने जग चिंताग्रस्त आहे. चांगले काम उभे व्हायला कार्यकर्त्याला वेड लागावे लागते. समाजाच्या भल्यासाठीच्या वेडात चांगली कामे होतात. स्वतःसाठी जगणारी माणसे कायमची मरतात. जी माणसे आपला गाव, समाज असा विचार करतात ती खर्‍या अर्थाने जगतात; म्हणून प्रपंच मोठा करा. सतत काम करत रहा. नैराश्य हा एक रोग आहे. जीवनात नैराश्य येऊ देऊ नका. आबासाहेबांनी वेड्यासारखं बेभान होऊन पर्यावरणाचं काम केले होते.’

३. पर्यावरणाच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आला आहे. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात असलेली अनास्था न्यून करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिले पाहिजे. पालटलेल्या समाजजीवनाच्या चक्राचा आपण विचार करायला हवा आहे. पर्यावरणीय चांगल्या कामांना समाजाचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, हे सत्य आहे; पण हेही दिवस पालटतील. जे चांगले आहे ते टिकेल; म्हणून आपण सर्वांनी चांगुलपणाची कास धरून अण्णा हजारे आणि स्व. आबासाहेब मोरे यांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालत रहायला हवे.