सर्वाधिक अनुयायी असलेल्या २० ट्विटर खात्यांमध्ये पंतप्रधान मोदी हे अमेरिकेबाहेरील एकमेव राजकीय नेते !

वॉशिंग्टन (अमेरिका) – ट्विटर हे सामाजिक माध्यम गेल्या काही वर्षांपासून जगभरातील सरकारे, तसेच सामाजिक संघटना आणि मान्यवर यांच्यासाठी त्यांची अधिकृत भूमिका मांडणारे प्रभावी माध्यम बनले आहे. मुळात अमेरिकी आस्थापन असल्याने सहाजिकच तिच्या नागरिकांचे ट्विटरवर सर्वाधिक अनुयायी, म्हणजे ‘फॉलाअर्स’ आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक हा स्वत: ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा असून त्यांचे १४ कोटी १० लाखांहून अधिक अनुयायी आहेत.

१. मस्क यांच्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (१३ कोटी २० लाख), कॅनडाचे प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर (११ कोटी २० लाख), ब्राझिलचे फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो (१० कोटी ८० लाख) आणि अमेरिकी गायिका रिहान्ना (१० कोटी ८० लाखांहून अल्प) अशा प्रथम ५ लोकांची ट्विटरवर सर्वाधिक अनुयायी असणार्‍यांच्या सूचीत वर्णी लागते.

२. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ व्या क्रमांकावर असून त्यांचे एकूण अनुयायी ८ कोटी ९० लाख इतके आहेत. विशेष म्हणजे प्रथम २० ट्विटर खात्यांच्या सूचीत तब्बल १६ खाती ही अमेरिकेतील असून केवळ पंतप्रधान मोदी हे अमेरिकेबाहेरील एकमेव राजकीय नेते आहेत, ज्यांचा या सूचीत समावेश आहे.

३. या सूचीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (८ कोटी ६० लाख) आणि बिल गेट्स (६ कोटी २० लाख) यांचाही समावेश आहे.

४. सूचीमध्ये ‘यूट्यूब’ (७ कोटी ८० लाख), ‘नासा’ (७ कोटी ३० लाख), ‘ट्विटर’ (६ कोटी ५० लाख) आणि ‘सीएन्एन् ब्रेकिंग न्यूज’ (६ कोटी ३० लाख) या अमेरिकी आस्थापनांच्या खात्यांचाही समावेश आहे.