(म्हणे) ‘पुलाच्या बांधकामात त्रुटी राहिल्याने तो पाडला !’ – तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री

  • भागलपूर (बिहार) येथील गंगानदीवरील निर्माणाधीन पूल कोसळल्याचे प्रकरण

  • बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा दावा !

  • १ सहस्र ७५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत होता पूल !

  • गेल्या ११ वर्षांपासून चालू होते बांधकाम !

भागलपूर (बिहार) – येथील सुलतानगंज-अगुवानी भागात गंगानदीवर बांधण्यात येणारा पूल ४ जूनच्या सायंकाळी कोसळला. या वेळी येथे कामावर असणारे २ सुरक्षारक्षक बेपत्ता आहेत. राज्य आपत्कालीन साहाय्यता पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दावा करत सांगितले, ‘तुम्हाला ठाऊक असेल की, गेल्या वर्षी पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर आम्ही चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ‘आयआयटी रुरकी’ने अभ्यास केल्यानंतर पुलाचे बांधकाम सदोष असल्याचे समोर आले. त्यानंतर आम्ही पूल पाडण्यास सांगितले.’ रस्ते बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले की, पुलाचे बांधकाम करणार्‍या आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्यात आले असून गुन्हाही नोंदवण्यात येणार आहे.

हा पूल ‘एस्.पी. सिंगला’ हे आस्थापन बांधत होते. हा पूल खगडिया आणि भागलपूर जिल्ह्यांना जोडण्यासाठी बांधण्यात येत होता. गेल्या वर्षी २७ एप्रिलला या पुलाचा काही भाग नदीमध्ये कोसळला होता. ३ किलोमीटर लांबीचा हा पूल १ सहस्र ७५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत होता. वर्ष २०१२ पासून याचे काम चालू होते, असे सांगितले जात आहे. भाजपने या घटनेच्या प्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे त्यागपत्र मागितले आहे.

संपादकीय भूमिका

  • शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यंत बिहारमधील राजद आणि जनता दल (संयुक्त) यांचे सरकार झोपले होते का ?
  • संबंधित सरकारी अधिकारी, मंत्री आणि बांधकाम आस्थापन यांच्याकडून आतापर्यंत झालेला सर्व खचू वसूल केला पाहिजे. यासाठी बिहारच्या जनतेने संघटित होऊन मागणी केली पाहिजे !