केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आंदोलक कुस्तीपटूंची चर्चा

नवी देहली – महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गेल्या एक मासापासून जंतरमंतर येथे आंदोलन करणार्‍या भारतीय कुस्तीपटूंशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ४ जूनच्या रात्री जवळपास दीड घंटे चर्चा केली. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता अन्वेषण केले जाईल’, असे आश्‍वासन अमित शहा यांनी कुस्तीपटूंना दिले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेसंदर्भात बोलतांना, ‘जी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यानुसार सर्व काही पार पडेल’, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

अल्पवयीन महिला कुस्तीपटूकडून ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोप मागे !

ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप करून आंदोलन चालू केले असतांना आता शोषणाच्या वेळी अल्पवयीन असणार्‍या एका महिला कुस्तीपटूने आरोप मागे घेतले आहेत. देहली पोलिसांनी या अल्पवयीन कुस्तीपटूचा जबाब पटियाला हाऊस न्यायालयात नोंदवला आहे.