ओडिशा दुर्घटनेवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर अमेरिकेतून टीका !

न्यूयॉर्क (अमेरिका) – ओडिशाील भीषण रेल्वे अपघाताच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतून केंद्र सरकारवर टीका केली आहे. न्यूयॉर्क येथे भारतीय समुदायाला संबोधित करतांना गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शासन वास्तव स्वीकारत नाही. केंद्रात काँग्रेसची सत्ता असतांना असाच एक रेल्वे अपघात झाला होता. तेव्हा काँग्रेसने ‘इंग्रजांच्या चुकीमुळे तो अपघात झाला’, असे म्हटले नव्हते, तर आम्ही आमचे दायित्व स्वीकारून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांना त्यागपत्र द्यायला लावले होते. भाजप स्पष्टीकरण देत असून वास्तव स्वीकारत नाही. भाजपला दोषारोप करण्याची आणि चुका न स्वीकारण्याचीही सवय आहे.

२७० हून अधिक मृत्यूंच्या वेदनादायी अपघाताचे दायित्व स्वीकारण्यापासून मोदी सरकार पळून जाऊ शकत नाही. पंतप्रधानांनी तात्काळ याचा शोध घ्यावा आणि रेल्वेमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे, असे ट्वीटही गांधी यांनी नुकतेच केले होते.

संपादकीय भूमिका 

कुठल्याही गोष्टीचे राजकारण केले नाही, तर ते राजकारणी कसले ? कुठल्याही सामाजिक आघाताच्या प्रसंगात जनतेला एकसंधता राखण्याचे आवाहन करणारे राजकारणी स्वतः मात्र त्याचे पालन कधी करत नाहीत, हे जाणा !