२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या आमिषाने तरुणास ६ लाखांचा गंडा !

सांगलीच्या पोलिसासह तिघांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

अथणी (जिल्हा बेळगाव) – सांगली येथील तासगाव तालुक्यातील समीर भोसले यांच्याशी अज्ञाताने भ्रमणभाषवर संपर्क साधला आणि १ जून या दिवशी त्यांना २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या आमिषाने चौघांच्या टोळीने कर्नाटकातील मंगसुळी येथे बोलावून घेत ६ लाखांचा गंडा घातला. खंडोबा देवस्थान परिसरात चारचाकीमध्ये पैसे घेतल्यानंतर पोलीस आल्याची बतावणी करत भोसले यांना पळवून लावले. या टोळीत सांगली पोलीस दलातील शिपाई सागर जाधव यांचा समावेश असून कागवाड पोलिसांनी त्यांच्यासह तिघांना अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार पसार आहे.

भोसले यांनी या प्रकाराची माहिती कागवाड पोलिसांना दिली. पोलिसांनी सापळा रचून सांगली पोलीस दलातील शिपाई सागर जाधव यांच्यासह आरिफ सागर, लक्ष्मण नाईक या तिघांना अटक केली आहे. जाधव मिरज शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांचे तासगाव पोलीस ठाण्यात स्थानांतर झाले आहे; मात्र स्थानांतराच्या ठिकाणी ते उपस्थित झाले नव्हते. ते मंगसुळीतील फसवणूक प्रकरणात सापडल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी सांगलीचे पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांना घटनेची माहिती दिली. डॉ. तेली यांनी रितसर कारवाईच्या सूचना दिल्यानंतर जाधवसह तिघांवरही गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

संशयितांकडे पाचशेच्या १० खर्‍या नोटा आढळल्या, तर इतर नोटा बनावट होत्या. लहान मुलांच्या खेळासाठी वापरल्या जाणार्‍या ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे लिहिलेल्या ५०० च्या नोटांची १२७ बंडले सापडली. ती सर्व कागवाड पोलिसांनी जप्त केली आहेत.

संपादकीय भूमिका

असे गुन्हेगार प्रवृत्तीचे पोलीस कायद्याचे रक्षण कसे करणार ?

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच जनतेला लुटावे, यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणती  ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !