गोव्यात ‘होम स्टे’ योजनेला मोठ्या प्रमाणात वाव ! – पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

(‘होम स्टे’ म्हणजे पर्यटकांना रहाण्यासाठी घराच्या काही भागांत सर्व सुविधा उपलब्ध करणे)

डावीकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संबोधित करतांना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

पणजी, ३ जून (वार्ता.) – गोव्यात ‘होम स्टे’ योजनेला मोठ्या प्रमाणात वाव आहे. गोवा सरकारने ‘गोवा स्टे’ योजनेला चालना देणारे धोरण आखले पाहिजे आणि यामुळे अधिक खर्च करण्याची क्षमता असलेले पर्यटक गोव्यात आकर्षिले जाऊ शकतात, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले. पणजी शहरात उद्योजकांशी वार्तालाप करतांना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हे आवाहन केले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचीही उपस्थिती होती.

गोयल पुढे म्हणाले, ‘‘होम स्टे’साठी केंद्राच्या योजनेच्या अंतर्गत ‘मुद्रा’ कर्ज मिळू शकते. माल्दीव देशात विविध संकल्पनांद्वारे पर्यटकांना तेथे आकर्षित केले जाते. गोव्यात केवळ थंडीच्या दिवसांतच पर्यटक येतात असे नाही, तर गोव्यात अन्य काळातही पर्यटक येत असतात. मी मनोरंजन क्षेत्रातील लोकांशी वार्तालाप करून त्यांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करेन. विज्ञापननिर्मात्या संस्थांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारने सर्व नियम शिथिल  केले पाहिजेत.’’

औषधनिर्मितीचे मुख्य स्थान या नात्याने केंद्रशासन गोव्याचा विकास करणार

‘‘केंद्रशासन औषधनिर्मितीसाठी गोव्यासह गुजरात, तेलंगाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या एकूण ५ राज्यांचा विकास करण्याचा विचार करत आहे. यासाठी केंद्रशासन देशातील औषधनिर्मिती क्षेत्रातील सर्वांत मोठ्या २० ते ३० उद्योजकांशी चर्चा करणार आहे’’, अशी माहिती केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी या वेळी दिली. केंद्रीयमंत्री गोयल यांनी तत्पूर्वी पत्रकारांशी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीतील शासनाच्या कामगिरीची माहिती दिली. काळे धन अल्प करणे, ३९ लाख कोटी रुपये गरिबांच्या कल्याणासाठी थेट संबंधितांच्या खात्यात जमा करणे, आर्थिक उलाढालीला अनुसरून भारत जगात पाचव्या क्रमांकावर पोचणे आदी फलनिष्पत्तीची त्यांनी माहिती दिली.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच ‘कार्गो’ वाहतूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

(‘कार्गो’ म्हणजे विमानातून माल ने-आण करणे)

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच ‘कार्गो’ वाहतूक केली जाणार आहे आणि याचा राज्यातील औषधनिर्मिती प्रकल्पांना लाभ होणार आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी व्यक्त केले. राज्याचे वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो म्हणाले, ‘‘गोव्यात दाबोळी आणि मोपा या दोन्ही विमानतळांवर हवाई वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे.’’