पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार !

  • डिसेंबर किंवा जानेवारी मासात होणार सोहळा !

  • ७ दिवस राष्ट्रीय स्तरावर चालणार महोत्सव !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येत उभारल्या जाणार्‍या भवतय श्रीराममंदिरात १५ डिसेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’ प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करणार आहे. या सोहळ्याचा दिनांक अद्याप निश्‍चित झालेला नाही. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा देशभरात ७ दिवस साजरा केला जाईल, अशी माहिती न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

चंपत राय पुढे म्हणाले की,

१. श्रीराममंदिराचा तळमजला आणि गर्भगृह यांचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. तळमजल्याचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

२. न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज या सोहळ्याची निमंत्रणपत्रिका सिद्ध करतील. त्यावर महंत नृत्य गोपालदास स्वाक्षरी करणार आहेत.

३. देशभरात ७ दिवस चालणार्‍या या महोत्सवासाठी संत-धर्माचार्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे.

रामलल्लांच्या मूर्तीची उंची ८ फूट असेल !

रामलल्लाच्या ३ मूर्ती सिद्ध करण्याचे काम चालू झाले आहे. त्यासाठी कर्नाटकातील २ काळे दगड आणि राजस्थानमधीले पांढरे संगमरवर वापरले जात आहेत. यांपैकी गर्भगृहात ठेवण्यासाठी निवडली कोणती मूर्ती जाईल ?, हे अजून निश्‍चित झालेले नाही. या मूर्ती सिद्ध होण्यासाठी अनुमाने ४ मासांचा कालावधी लागणार आहे. कर्नाटकातील कारागीर गणेश एल्. भट्ट आणि राजस्थानतील कारागीर सत्यनारायण पांडे यांच्या नेतृत्वात हे काम चालू आहे. शिल्पकार गणेश भट्ट यांनी याविषयी सांगितले की, या मूर्ती ५१ इंच उंच करायच्या आहेत. मूर्ती स्थापित केल्यानंतर त्यांची उंची ८ फूट असू शकते.