काठमांडू (नेपाळ) – भारताच्या नव्या संसद भवनात लावण्यात आलेल्या अखंड भारताच्या मानचित्रामुळे (नकाशामुळे) नेपाळसह भारताच्या सर्व शेजारी देशांमध्ये अनावश्यक आणि हानीकारक वाद निर्माण होऊ शकतो, असे ट्वीट नेपाळचे माजी पंतप्रधान तथा नेपाळ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष बाबूराम भट्टराई यांनी केले. या मानचित्रात नेपाळमधील कपिलवस्तू आणि लुंबिनी हे प्रांत दाखवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या मानचित्रावर आक्षेप घेतला आहे.
सौजन्य नवभारत टाईम्स
भट्टराई पुढे म्हणाले की, या मानचित्रामुळे भारताचे त्याच्या शेजारच्या बहुतेक देशांशी असलेले द्विपक्षीय संबंध खराब होऊ शकतात, तसेच त्याची विश्वासार्हता अल्प होऊ शकते. भारतीय नेतृत्वाने या मानचित्राविषयीची वास्तविक माहिती आणि परिणाम यांविषयी सांगितले पाहिजे.
माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचाही विरोध !
अखंड भारताच्या मानचित्राला नेपाळचे भारतद्वेष्टे आणि चीनधार्जिणे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनीही आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, सध्या भारताच्या दौर्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड यांनी अखंड भारताच्या मानचित्रात नेपाळच्या २ प्रांतांचा समावेश केल्याविषयी विरोध नोंदवला पाहिजे.
संपादकीय भूमिकाअखंड भारताच्या मानचित्राद्वारे भारताचा इतिहास दाखवण्यात आला आहे, जो कधीही नाकारता येणार नाही. पूर्वी भारत अखंड होता आणि त्यात कोणते प्रदेश होते, हेच त्यात दर्शवण्यात आले आहे, यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल, तर ती हास्यास्पदच म्हणावी लागेल ! |