‘प्रतिदिन एखाद्या साधकाने तरी ‘त्याच्या चुकीसाठी ‘पाट्याटाकूपणा’ हा स्वभावदोष कारणीभूत आहे’, असे लिहिल्याचे फलकावरील चुका वाचतांना माझ्या लक्षात आले. कोणतीही कृती विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक न केल्यामुळे फलनिष्पती शून्य झाली की, ‘पाट्याटाकूपणा’ होतो, म्हणजे बहुतेक स्वभावदोषांना हा सामायिक (कॉमन) शब्द वापरला जातो. काही वेळा मला वाटले, ‘पाट्याटाकूपणा’ हा स्वभावदोष साधकांच्या अंगवळणी पडला आहे कि काय ? साधक स्वयंसूचना देऊन ‘पाट्याटाकूपणा’ या स्वभावदोषाची तीव्रता न्यून करण्यासाठी आणि ‘सावधानता’ हा गुण अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? या संबंधी सुचलेल्या काही ओळी पुढे दिल्या आहेत.
पाट्या टाकून टाकून, दुखली माझी मान ।
पकडून आणि ओढून लांबले माझे कान ।। १ ।।
सतत असतो मनावर, अनेक गोष्टींचा ताण ।
जातो वाया वेळ, रहात नाही भान ।। २ ।।
शरीर, मन, बुद्धीवर, पाट्याटाकूपणाचा पगडा ।
ध्यानात आल्यावर मन-बुद्धीचा होतो झगडा ।। ३ ।।
विचार, भावना, वर्तनाने; जेव्हा होईन एकरूप ।
तेव्हाच येईल माझ्या साधनेला योग्य स्वरूप ।। ४ ।।
अंतर्मनात साधनेचे ध्येय ठसत नाही अजून ।
म्हणून योग्य कृती होत नाही समजून-उमजून ।। ५ ।।
पडले वळण इंद्रियांशी, कळते पण वळत नाही ।
भटकते मन इकडे-तिकडे, विचार करते काही-बाही ।। ६ ।।
पालट अजून होत नाही वृत्तीतून कृतीत ।
इतके ठासून स्वभावदोष आणि अहं भरले माझ्या प्रकृतीत ।। ७ ।।
पाट्या टाकून टाकून, पाट्यांचा ढिग पडलाय ।
अहो, पाट्यांच्या वजनाने फलकसुद्धा कललाय ।। ८ ।।
निष्क्रीयतेला बहाणे हजार, प्रतिमेचा मांडलाय बाजार ।
खंत वाटते, तेव्हा मन होतं बेजार ।। ९ ।।
आहे फक्त योग्य विचार, भावना, कृतीचा अभाव ।
पाट्या टाकून टाकून, डोक्याला हात लावून बसलोय राव ।। १० ।।
आता तरी देवा, मला तूच यातून वाचव ।
स्वभावदोष आणि अहं गाडले जातील,
याचा काहीतरी उपाय सुचव ।। ११ ।।
– श्री. कोंडिबा जाधव (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७२ वर्षे), फोंडा, गोवा. (३.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |