।। श्रीकृष्णाय नम: ।।
प्रश्न –‘गंगा नदीत स्नान केले की सगळी पापे धुतली जातात’, असे सांगतात. असे सुद्धा ऐकले आहे की भागवतपुराणात सांगितले आहे की कोणाला हाक मारण्यासाठी जरी हरीचे नाव घेतले गेले तरी सर्व पापांचा नाश होतो. इतका सोपा उपाय असताना वेगवेगळ्या साधना कशाला करायच्या?
उत्तर – ‘मी गंगेत डुबकी मारली, आता माझी सर्व पापे धुतली गेली’ किंवा ‘मी श्रीहरीचे नाव घेतले, आता माझी सर्व पापे नष्ट झाली’ असा ठाम विश्वास किती जणांना असतो? कोणालाही निश्चिती नसते. सर्वांच्या मनात शंका असते! श्रद्धा आणि विश्वासच नाही, तर फळ कसे मिळणार? भगवान् श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत ‘संशयी मनुष्य नष्ट होतो’ असे सांगितले आहे –
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
नायं लोकोऽस्ति न परो न
सुखं संशयात्मन:।। अ.४ श्लो ४०
अर्थ – अज्ञानी आणि श्रद्धारहित आणि संशयग्रस्त ( मनुष्य ) नष्ट होतो. संशयी मनुष्याला इहलोक (लाभदायक होत) नाही, परलोक (लाभदायक होत) नाही आणि सुखही मिळत नाही.
दुसरी गोष्ट अशी की हरीनाम घेण्याने त्याची पापे नष्ट होतील असे भागवतात सांगितले आहे हे खरे आहे. पण त्याच्या प्रवृत्ती सुधारतील, त्याचा स्वभाव पालटेल, त्याची चित्तशुद्धी होईल, असे तेथे सांगितलेले नाही. मग समजा आधीची पापे नष्ट झाली तरी मूळ स्वभाव आधीचाच राहिल्याने हातून पुन्हा पापे घडतीलच.
पाप घडू नये, ह्यासाठी स्वभाव सुधारावा लागतो, चित्तशुद्धी करावी लागते; आणि त्यासाठी साधना करावीच लागते. साधनेला पर्याय नाही; कोणताही सोपा, छोटा मार्ग (short-cut) नाही. चित्तशुद्धीसाठी भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग इत्यादी साधना शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. तसे आचरण करून मोठा लाभ होईल; नुसते गंगास्नान करून किंवा हरीनामोच्चाराने तेवढा आणि तसा लाभ होणार नाही.
– अनंत आठवले.
२२.०४.२०२३
।। श्रीकृष्णापर्णमस्तु ।।
पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजीलेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. |