ऑस्ट्रेलियात मंदिरांवरील आक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे भारताचे पंतप्रधान मोदी यांना आश्‍वासन !

डावीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज

सिडनी (ऑट्रेलिया) – गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा केली. ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना ठेच पोचेल, अशी कृत्ये आम्ही स्वीकारणार नाही, असे धोरण ऑस्ट्रेलियाने स्वीकारले आहे. तसेच पंतप्रधान अल्बानीज यांनी आम्हाला आश्‍वासन दिले आहे की, भविष्यातही अशा घटकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी मंदिरांवरील आक्रमणांच्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई केल्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना धन्यवाद दिले.

पत्रकार परिषदेत पंतप्रधान अल्बानीज म्हणाले की, व्यवसाय आणि तंत्रज्ञान यांच्या देवाणघेवाणीच्या दृष्टीने दोन्ही देशांना साहाय्य करण्यासाठी ऑस्ट्रेलिया बेंगळुरूमध्ये वाणिज्य दूतावास उघडेल. सप्टेंबरमध्ये भारतात जी-२० शिखर परिषद होणार आहे. या निमित्ताने मला पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही देशांनी त्या क्षेत्रातही पुढे जावे, अशी माझी इच्छा आहे, ज्यावर आतापर्यंत फारसे काम झालेले नाही.

संपादकीय भूमिका

यापूर्वी ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे झाल्यावर ती रोखण्याचे आश्‍वासन ऑस्ट्रेलियाने दिले होते; मात्र त्यानंतरही आक्रमणे चालू आहेत. त्यामुळे अशा आश्‍वासनांवर किती विश्‍वास ठेवायचा ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उमटणारच !