बंगालमध्ये पुढील २-३ आठवडे ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होणे अशक्य !

सध्या एकाच चित्रपटगृहात दाखवला जात आहे चित्रपट !

राज्यातील चित्रपटगृहांमध्ये अन्य चित्रपटांचे आरक्षण झालेले असल्याने सध्यातरी ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित होण्याची शक्यता नाही

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर ममता बॅनर्जी सरकारने बंदी घाल्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतरही अद्याप राज्यात याचे प्रदर्शन होऊ शकलेले नाही. सध्या केवळ एकाच चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. पुढील २-३ आठवडे हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील चित्रपटगृहांमध्ये अन्य चित्रपटांचे प्रदर्शन होत आहे. त्यांचे आरक्षण झालेले असल्याने सध्यातरी ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित होण्याची शक्यता नाही. अनेक चित्रपटगृहांच्या मालकांनी चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे. त्यांना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून धमक्या आल्याने त्यांनी नकार दिल्याचा आरोप चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी यापूर्वीच केला आहे.

सध्या राज्यातील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बनगाव येथील चित्रपटगृहामध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होत असून त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे संगीतकार बिशाख ज्योती हे याच गावचे आहेत. याविषयी ते म्हणाले, ‘‘माझ्या गावामधील एका चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जात आहे, हे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. राज्यातील बहुतेक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवण्यास नकार दिला जात आहे. मला आशा आहे की, राज्यातील अन्य चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखवला जाईल.’’