अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

शिखांच्या वेशात येऊन धर्मांतर करत असल्याचा आरोप !

(शस्त्र बाळगणार्‍या योद्धा शिखांना निहंग शीख म्हणतात)

शिखांच्या वेशात येऊन धर्मांतर करतांना पाद्री

अमृतसर – येथे २१ मे या दिवशी ख्रिस्त्यांकडून धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत निहंग शिखांनी राजेवाल गावातील एका चर्चवर आक्रमण केले. तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली, तसेच यास विरोध करणार्‍या चर्चमधील लोकांना मारहाणही केली. यात २ जण घायाळ झाले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ख्रिस्त्यांनी आंदोलन केले. निहंग संघटनांचे म्हणणे आहे की, ख्रिस्ती येथे शिखांप्रमाणे वेशभूषा करून धर्मांतर करत आहेत. यावर आमचा आक्षेप आहे.

चर्चच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, २१ मे या दिवशी दुपारी चर्चमध्ये पूजा चालू असतांना काही निहंग शीख आले आणि त्यांनी चर्चवर आक्रमण केले. त्यांनी ख्रिस्त्यांच्या बायबल या धर्मग्रंथाचाही अवमान केला, तसेच आमच्या वाहनांची तोडफोड केली.

 (सौजन्य : TIMES NOW Navbharat)

आक्रमणर्त्यांना प्रत्त्युत्तर म्हणून जेव्हा ख्रिस्त्यांनी त्यांच्यावर दगडफेक चालू केली, तेव्हा आक्रमणकर्ते तेथून निघून गेले. ‘या प्रकरणी अन्वेषण चालू असून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सतिंदर सिंह यांनी दिली.

संपादकीय भूमिका

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !