पणजी, २१ मे (वार्ता.) – गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यावर अधिक प्रकाश टाकण्याविषयी पोर्तुगालहून कागदपत्रे आणण्याचा निर्णय सध्या सरकारने स्थगित ठेवला आहे. याविषयी पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘ही कागदपत्रे आणण्यासाठी राज्य सरकारने एक प्रतिनिधी मंडळ पोर्तुगालला पाठवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु काही लोकांनी यासंबंधी ‘या प्रतिनिधी मंडळाला सहलीसाठी पोर्तुगालला जायचे आहे’, असे म्हणून वाद निर्माण केला. सध्या पोर्तुगालला प्रतिनिधी मंडळ पाठवण्याविषयी आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ. मी माजी शिक्षण संचालिका सेल्सा पिंटो यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, ‘‘गोव्याशी संबंधित पुष्कळ महत्त्वाची कागदपत्रे पोर्तुगालमध्ये आहेत. त्यांनी पोर्तुगालमध्ये ही कागदपत्रे पाहिली आहेत.’’
Plan to get historical papers from Portugal put on hold: Minister https://t.co/pDNBFahV3t
— TOI Goa (@TOIGoaNews) May 20, 2023
गेल्या वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरातत्व विभागाचे संचालनालय आणि मंत्री यांना केंद्रीय परराष्ट्र खात्याच्या साहाय्याने गोव्याशी संबंधित पोर्तुगालमधील कागदपत्रे मिळवण्याविषयी सूचना दिल्या होत्या. ही कागदपत्रे परत गोव्यात आणल्यास अनेक गूढ विषय समजतील, अशी सरकारला आशा होती.’’ (सरकारने ही कागदपत्रे लवकरात लवकर गोव्यात आणून सार्वजनिक केल्यास त्यातून वस्तूस्थिती गोमंतकीय जनतेसमोर येईल. – संपादक)