हत्तींच्या समस्येकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
दोडामार्ग – तालुक्यातील केर, मोर्ले परिसरात आलेल्या हत्तींना जंगलात हाकलण्यासाठी बंगाल येथून ‘हाकारी पथक’ जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे येणार आहे, तसेच हत्तींची समस्या आणि अन्य प्रश्न सोडवण्यात येणार आहेत, असे आश्वासन वनविभागाने दिल्याने तेथील ग्रामस्थांनी २५ मेपासून घोषित केलेले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची माहिती केर गावचे उपसरपंच तेजस देसाई आणि मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी दिली.
(सौजन्य : zee २४ तास)
केर, मोर्ले परिसरात हत्तींची समस्या जटील झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तींना हटवणे, तसेच अन्य मागण्यांविषयी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. या ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्यांविषयी येथील वनविभागाला निवेदन देऊन त्या पूर्ण कराव्यात अन्यथा २५ मेपासून अन्नत्याग आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती. यामुळे जागे झालेल्या वनविभागाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. येथील समस्यांविषयी वरिष्ठ अधिकार्यांना अहवाल पाठवून त्याची प्रत ग्रामस्थांना २२ मे या दिवशी देऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी तूर्तास अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. वनविभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करतांना केर, मोर्ले गावाचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या मागण्या
१. घोटगेवाडी, मोर्ले, केर येथील रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी जाळी बसवून रस्ता सुरक्षित करावा. वनविभागाचे कर्मचारी दिवस-रात्र तैनात ठेवावेत. येथे सेवेत असणार्या कर्मचार्यांनी त्यांचे भ्रमणभाष क्रमांक संबंधित ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर लावावेत.
२. केर गावातील हत्तींचे वास्तव्य, झालेली हानी आणि केलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर तपशील मिळावा. ग्रामस्थांना येत असलेले भीतीदायक अनुभव आणि होणारी हानी, यांचा लेखी तपशील ग्रामस्थांसह बैठक घेऊन वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवण्यात यावा.
३. शेतकरी शेती करत नसल्याने प्रति कुटुंब अनुदान घोषित करावे.