सौदी अरेबियात घराच्या दारावर लावलेले स्वस्तिक चिन्ह नाझीचे चिन्ह असल्यावरून हिंदु अभियंत्याला अटक आणि सुटका !

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियामध्ये एका हिंदु अभियंत्याला घराच्या दारावर स्वस्तिक चिन्ह लावल्यामुळे अटक करण्यात आली. स्वस्तिक हे नाझीचे चिन्ह वाटल्यामुळे ही घटना घडली. पोलिसांना या संदर्भात स्पष्ट करण्यात आल्यावर या अभियंत्याला सोडण्यात आले.

आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे रहाणारा हा ४५ वर्षीय हिंदु अभियंता गेल्या वर्षभरापासून सौदी अरेबियामध्ये नोकरी करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या कुटुंबियांना सौदी अरेबियाला येथे बोलावले होते. त्या वेळी त्यांनी घराच्या दारावर स्वस्तिक चिन्ह लावले. त्यामुळे शेजारी  रहाणार्‍या व्यक्तीने पोलिसांत तक्रार करत जीविताला धोका असल्याचेही म्हटले होते. यामुळे या अभियंत्याला अटक करण्यात आली. पोलिसांना ‘स्वस्तिक हिंदु धर्माचे चिन्ह आहे’, हे पटवून देण्यासाठी येथील अनिवासी भारतीय सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल शेख यांनी साहाय्य केले. त्यानंतर पोलिसांनी या अभियंत्याची सुटका केली.