हिंदूंना ‘भाईचारा’ शिकवणारे जामा मशिदीत हनुमान चालिसा पठणाला अनुमती देतील का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

लोकशाही मराठी’ वृत्तवाहिनीवरील ‘द त्र्यंबकेश्‍वर फाइल्स’ या विषयावर चर्चासत्र !

मुंबई – मंदिरात धूप दाखवायचा होता, तर मुसलमानांनी देवस्थानची रितसर अनुमती का घेतली नाही ?  हिंदूंच्या उत्सवाच्या वेळी मशिदीच्या जवळून शोभायात्रा काढलेली मुसलमानांना चालत नाही. तेथे वाद्ये वाजवल्यास दगडफेक केली जाते. असे असतांना काँग्रेसचे सचिन सावंत केवळ हिंदूंना भाईचारा शिकवणार का ? हिंदूंना ‘भाईचारा’ शिकवणारे जामा मशिदीमध्ये होम हवन, आरती करण्याला आणि हनुमान चालिसा पठण करण्याला अनुमती देतील का ? असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘लोकशाहीचा मुद्दा’ या कार्यक्रमात ‘द त्र्यंबकेश्‍वर फाइल्स’ या चर्चेमध्ये ते बोलत होते.

या चर्चासत्रामध्ये काँग्रेसचे माजी प्रवक्ते सचिन सावंत, मुसलमान अभ्यासक सर्फराज शेख आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे सहभागी झाले होते.

या वेळी सुनील घनवट म्हणाले, ‘‘त्र्यंबकेश्‍वर मंदिरात धूप दाखवायला निघालेले उत्तरप्रदेशमध्ये ज्ञानव्यापी मंदिरात मात्र हिंदूंच्या प्रवेशाला विरोध करतात. मुळात मंदिरात धूप दाखवण्यासाठी जाणारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांना मानतात का ? जामा मशिदीमध्ये हिंदूंच्या पवित्र तीर्थांचे तीर्थ शिंपडलेले त्यांना चालेल का ? त्र्यंबकेश्‍वर मंदिरात केवळ हिंदूंना प्रवेश आहे. तशी सूचना तेथे लावण्यात आली आहे. मंदिराचा तसा नियम आहे.  सर्वोच्च न्यायालयानेही विश्‍वस्तांना परंपरेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिरात शिरण्याचा अट्टाहास करणारे त्याचे पालन का करत नाहीत ? मागील ३-४ वर्षांत रस्त्यावरून धूप दाखवण्याचा पायंडा निर्माण करण्यात आला आहे. रस्ता आणि मंदिराचे प्रवेशद्वार यांमध्ये ५० फुटांचे अंतर आहे. रस्त्यावरून धूप दाखवणे आणि मंदिरात प्रवेश करणे यांमध्ये भेद आहे.

मंदिरात शिरून धूप दाखवण्यामागे कोणते षड्यंत्र आहे ? याचा शोध घ्यायला हवा. यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती केली, यासाठी आम्ही शासनाचे अभिनंदन करतो. त्र्यंबकेश्‍वर हे हिंदूंचे पवित्र्य ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे तेथे प्रवेशद्वारावर जाऊन धूप दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? काही ठिकाणीही उदाहरणे देऊन ‘सर्व ठिकाणी भाईचारा आहे’, हे दाखवण्याचा प्रयत्न कशासाठी होत आहे ? अनेक ठिकाणी असा ‘भाईचारा’ दिसून येत नाही. त्र्यंबकेश्‍वर मंदिरामध्ये धूप दाखवण्याच्या अट्टाहासाचा समस्त हिंदु समाजाकडून आम्ही सार्वजनिकरित्या निषेध करतो.’’