भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

स्टॉकहोम (स्विडन) – भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे. भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत.  आंतरराष्ट्रीय योग दिन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा उपक्रम संपूर्ण जगाने उत्स्फूर्तपणे स्वीकारला आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर ‘इंडो-पॅसिफिक मिनिस्ट्रियल फोरम’च्या कार्यक्रमात केली. त्यासाठी ते ३ दिवसांच्या स्विडनच्या दौर्‍यावर आहेत. यासह जयशंकर यांनी भारतामध्ये चालू असलेल्या विकासाच्या उपक्रमाविषयी आणि परदेशात रहाणार्‍या भारतियांसाठी निर्माण केलेल्या संधींविषयी चर्चा केली.

…अन् परराष्ट्र मंत्र्यांनी वापरली हिंदी म्हण !

येथील भारतीय समुदायाशी संवाद साधतांना परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी भारतीय संस्कृतीच्या जागतिकीकरणावर विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी हिंदी म्हण वापरली. जयशंकर यांना विचारण्यात आले की, भारतीय संस्कृतीच्या जागतिकीकरणाच्या या युगात लोक पाश्‍चात्य ‘हॅम्बर्गर’ऐवजी ‘पाणी पुरी’ खाणे चालू करतील का ? आणि ‘एच् अँड एम् टी-शर्ट’वर न्यूयॉर्कऐवजी ‘नवी देहली’ असे छापतील का ? याच्या उत्तरात जयशंकर यांनी ‘आपके मुंह में घी-शक्कर’ (तुमच्या तोंडात तूप-साखर) (अर्थ : तुम्ही जे म्हणत आहात, ते खरे ठरो) हा हिंदी वाक्प्रचार वापरला. त्यास उपस्थितांनी हासून दाद दिली.