गुन्हा नोंदवून विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशीचे आदेश !

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचे प्रकरण

मुंबई – नाशिक येथील जागृत देवस्थान त्र्यंबकेश्‍वर मंदिरात काही मुसलमानांनी बळजोरीने घुसून शिवपिंडीवर शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. ‘अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली हे विशेष पोलीस पथक काम करेल’, असे फडणवीस यांनी सांगितले. १३ मेच्या रात्री ९.४१ वाजता उरूसाच्या (धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी काढलेल्या मिरवणुकीच्या) निमित्ताने स्थानिक मुसलमानांनी मिरवणूक काढली. या वेळी मिरवणुकीतील काही मुसलमानांनी मंदिरातील शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्यासाठी उत्तर महाद्वारातून मंदिराच प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. येथील सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.