शेतपाटाचे काम २१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांचे आश्वासन
दोडामार्ग – तालुक्यातील झरेबांबर येथील शेतपाटाचे अपूर्ण असलेले काम २१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन तिलारी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी दिल्याने १५ मे या दिवशीचे ‘जलसमाधी’ आंदोलन ग्रामस्थांसह सरपंच अनिल शेटकर यांनी तूर्तास स्थगित केले; मात्र ‘२१ मे हा शेवटचा दिनांक असून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न केल्यास २२ मे या दिवशी जलसमाधी घेण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका’, अशी चेतावणी या वेळी ग्रामस्थांनी दिली.
(सौजन्य : Kokan Now)
झरेबांबर गावात तिलारी पाटबंधारे खात्याकडून धरणाचे पाणी शेतकर्यांपर्यंत पोचवण्यासाठी शेतपाट बांधण्यास मान्यता मिळाली आहे; मात्र अनेक वर्षे होऊनही शेतपाटाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचले नाही. याविषयी माजी सरपंच स्नेहा गवस यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला; मात्र त्यांना अधिकार्यांनी ठोस आश्वासन न देता टोलवाटोलवी केली. आता विद्यमान सरपंच अनिल शेटकर यांनीही पाठपुरावा चालू ठेवला असता त्यांनाही प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी जलसमाधी घेण्याची चेतावणी दिली होती. त्या वेळी प्रशासनाने १५ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, तरीही संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्यात अधिकारी अल्प पडले. त्यामुळे १५ मे या दिवशी सरपंच अनिल शेटकर ग्रामस्थांसमवेत तिलारी धरणाच्या येथील कालव्यावर जलसमाधी घेण्यासाठी पोचले. हे समजताच तिलारी प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता म्हेत्रे आणि संबंधित ठेकेदाराचा पर्यवेक्षक कालव्यावर पोचले. या वेळी अभियंत्यांनी काम पूर्ण करण्यास आणखी ५ दिवसांचा कालावधी मागितला.
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपयांची धरणे बांधल्यानंतर त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा विविध प्रकल्प हे ठेकेदार अन् अधिकारी यांच्या लाभासाठीच असतात, असेच जनतेला वाटेल ! |