‘आप’च्या गोव्यातील निवडणूक प्रचाराशी संबंधित वृत्तवाहिनीचा अधिकारी हवाला व्यवहारावरून ‘सी.बी.आय.’च्या कह्यात

(‘हवाला’ म्हणजे अरबी आणि दक्षिण आशिया येथील देश पैशांचे हस्तांतर करण्यासाठी वापरत असलेली एक विशिष्ट प्रणाली)

पणजी, १५ मे (वार्ता.) – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) ‘इंडिया अहेड न्यूज’ या वृत्तवाहिनीचा व्यावसायिक प्रमुख आणि ‘प्रॉडक्शन कन्ट्रोलर’ अरविंद कुमार सिंह याला कह्यात घेतले आहे. देहली अबकारी घोटाळा आणि हवाला व्यवहार यांच्या अन्वेषणासाठी अरविंद कुमार सिंह यांना कह्यात घेण्यात आले आहे.

अरविंद कुमार सिंह यांनी १७ कोटी रुपये ‘चेरियट इंडिया’ या आस्थापनाला हवालाच्या माध्यमातून पाठवल्याचा आरोप आहे. ‘चेरियट इंडिया’ या आस्थापनाकडे गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे ‘आम आदमी’ पक्षाचे प्रसिद्धी मोहिमेचे दायित्व होते. सी.बी.आय.ला अन्वेषणात ‘हवाला’ व्यावसायिकांचे ‘व्हॉटस्ॲप’ संदेश सापडले असून यामध्ये जून २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत अरविंद कुमार सिंह यांनी ‘चेरियट इंडिया’ या आस्थापनाला १७ कोटी रुपये हवाला व्यवहाराद्वारे पोचवल्याचे स्पष्ट होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ‘चेरियट इंडिया’चे मालक राजेश जोशी यांना ८ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले आहे आणि त्यांना देहली येथील विशेष न्यायालयाने ६ मे या दिवशी जामीन दिला आहे.