इम्रान खान यांची अटक अवैध असल्याने त्यांची सुटका करा ! – सर्वोच्च न्यायालय

पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची सुटका करण्याचा आदेश पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने इम्रान खान यांची अटक अवैध असल्याचे सांगत हा आदेश दिला. ‘नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरो’ या विभागाने इम्रान खान यांना २ दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून बलपूर्वक अटक केली होती. त्यांच्यावर ‘अल् कादीर ट्रस्ट’मध्ये घोटाळा केल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

१. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पाक सरकारच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालय आतंकवाद्याला पाठिंबा देत आहे. इम्रान खान यांना अटक केल्यानंतर कट रचून हिंसाचार करण्यात आला होता. सैन्यावर आक्रमण करण्यात आले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांची अटक कायदेशीर पद्धतीने केल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत अवघ्या ४८ घंट्यांत सर्वोच्च न्यायालयाच्या पोटात दुखणे समजण्यापलीकडे आहे. या माणसामुळे २ दिवसांत संपूर्ण देश पेटला. याआधी त्याने पोलीस आणि निमलष्करी दल यांच्यावर आक्रमण केले, तेव्हा सर्वोच्च न्यायालय गप्प का होते ?

२. इम्रान खान यांना अटक झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९० लोक घायाळ झाले आहेत. सिंध प्रांत वगळता पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान येथे सैन्याला तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे १ सहस्र ९०० नेते आणि कार्यकर्ते यांना अटक केली आहे.