‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाला नव्हे, तर सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली आहे ! – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बोलतांना

नागपूर, १० मे (वार्ता.) – मुलींचे शोषण करण्याचे षड्यंत्र केले जात आहे. धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक विदारक सत्य जनतेपुढे आले आहे. खरेतर हा केवळ एक चित्रपट नसून जनजागृतीचे माध्यम आहे. ‘जे लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे’, असे बोलले, त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे भाजपकडून जोरदार समर्थन होत आहे, या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांसमवेत जाऊन हा चित्रपट पाहिला.

ते म्हणाले की, कशा प्रकारे आज देश पोखरला जात आहे ? कशा प्रकारे आमच्या भगिनींसमवेत षड्यंत्र रचले जात आहे ? हे सर्वांसमोर आले पाहिजे. हा चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे डोळे उघडतील.

‘या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भर चौकात फाशी दिली पाहिजे’, असे जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाविषयी पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, आव्हाड असे बोलले असतील, तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि अनधिकृत आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी असे बोलून हिंदु समाजात रोष निर्माण होतो. हे वक्तव्य पडताळून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल.

कायदा आहे आणि तो कडक करावा लागेल; मात्र त्याचसमवेत समाजाचे एक जाळे सिद्ध करावे लागेल; कारण कायदा सर्व गोष्टी करू शकेलच असे नाही. यासाठी जागरूकता आणणेही महत्त्वाचे आहे.