यंत्र खरेदी प्रकरणी सेवानिवृत्त वैद्यकीय संचालकांवर कारवाई !

वाय.सी.एम्. रुग्णालय

पिंपरी (पुणे) – येथील वाय.सी.एम्. रुग्णालयासाठी खरेदी करण्यात येणारे एच्.बी.ओ.टी. (हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी) यंत्राच्या निविदा प्रक्रियेत निकोप स्पर्धा झाली नाही. महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी हे यंत्र खरेदीचा आदेश दिला. त्यामुळे त्यांच्यावर ८ वर्षांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अय्यर यांच्या निवृत्तीवेतनातील १० टक्के रक्कम पुढील ५ वर्षांसाठी कायमस्वरूपी राखून ठेवण्याची कारवाई आयुक्त, तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी केली.

डॉ. अय्यर यांनी यंत्र खरेदी करण्यापूर्वी निविदेला व्यापक प्रसिद्धी दिली नाही, तसेच हे यंत्र खरेदीच्या निविदा प्रक्रियेस स्वतःच्या अधिकारातून संमती दिली. या अनियमिततेला उत्तरदायी धरून डॉ. अय्यर यांची ८ सप्टेंबर २०१५ या दिवशी विभागीय चौकशी चालू केली होती. चौकशी अधिकारी डॉ. एस्.बी. पानसे यांनी २६ मे २०१७ या दिवशी आयुक्तांना अहवाल सादर केला. चौकशीतील ५ आरोपांपैकी ३ आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकार्‍यांनी नोंदवला. कर्मचारी सेवेच्या कालावधीत गैरवर्तणूक केल्याचे चौकशीत आढळल्याने कारवाई करता येते, त्यामुळे डॉक्टरांवर सिद्ध झालेल्या आरोपान्वये त्यांच्या अनुज्ञेय निवृत्तीवेतनातील रक्कम राखून ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीमध्ये संमती दिली.