अजिंठा आणि वेरूळ लेणी पहाण्यासाठी जातांना उग्र ‘परफ्यूम’ आणि लाल रंगाचे कपडे टाळा !

मधमाशांचे आक्रमण टाळण्यासाठी तज्ञांकडून पर्यटकांना आवाहन  

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी पहाण्यासाठी येणार्‍यांची संख्या मोठी आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील पर्यटक या ठिकाणी येत असतात; मात्र मागील काही दिवसांत अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमध्ये मधमाशांकडून पर्यटकांवर आक्रमण होण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यासाठी अजिंठा आणि वेरूळ लेणी पहाण्यासाठी जातांना उग्र परफ्यूम आणि लाल रंगाचे कपडे टाळा, असे आवाहन तज्ञांकडून करण्यात येत आहे.

१. काही दिवसांपूर्वी अजिंठा लेणी पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी आक्रमण केले होते. यात २० पर्यटक आणि ६ कर्मचारी घायाळ झाले होते. याच घटनेपूर्वी ९ एप्रिल या दिवशी वेरूळ लेणीच्या १६ क्रमांकाची कैलास लेणी पहातांना पर्यटकांवर माशांनी आक्रमण केले होते.

२. या आक्रमणात १६ पर्यटक घायाळ झाले होते. काही जण गंभीर घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी येथे मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळी आहेत.

३. सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले असून मधमाशांना पोळी थंड ठेवण्यासाठी थंड हवेची आवश्यकता असते. त्यामुळे मधमाशा लेणीच्या आत पोळे बनवतात. उष्णतेचे प्रमाण वाढल्यास ते मधमाशांना सहन होत नाही.

४. अशात काही पर्यटक वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम लावून येतात. विशेष म्हणजे अशाच काही मिथिलिन क्लोराईड आणि फेरॅान मिश्रित उग्र परफ्यूम यांमुळे मधमाशा आक्रमक होतात, तसेच या मधमाशांना लाल रंगाचाही राग असतो.

५. तापमान ३४ अंश सेल्सियसपेक्षा अधिक वाढल्यास मिथिलिन क्लोराईड आणि फेरॅान या रसायनांचा गंध अधिक उग्र होतो. याचा माणसांप्रमाणे मधमाशांनाही त्रास होतो. त्यामुळेच त्या माणसांवर आक्रमण करतात. गुटखा आणि सिगारेट यांच्या धुराचाही मधमाशांना त्रास होतो.

६. त्यामुळे वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी परिसरातील १ किलोमीटर अंतरावर वरील गोष्टींचा वापर करणे पर्यटकांनी टाळावे, असे आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे.