रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील साधिका श्रीमती अलका वाघमारे यांना भक्‍तीसत्‍संगांच्‍या संहिता लिखाणाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधकांची भाव, भक्‍ती वाढावी आणि त्‍यांची शीघ्र आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी, यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने भक्‍तीसत्‍संग घेतले जातात. या सत्‍संगांच्‍या माध्‍यमातून दैनंदिन जीवनात सेवा आणि साधना करतांना ‘भाव कसा ठेवावा ? साधनेत तळमळ कशी वाढवावी ? यांसारख्‍या साधनेच्‍या संदर्भातील अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन करण्‍यापूर्वी त्‍याची संहिता लिहून प्रसंगानुरूप विषय निश्‍चित केले जातात. हे लिखाण करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

श्रीमती अलका वाघमारे

१. संहिता लिखाणाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. संहिता लिखाणाची सेवा मिळाल्‍यावर प्रारंभी मनात नकारात्‍मक विचार येणे; परंतु ‘श्री गुरूंच्‍या कृपेनेच स्‍वतःमध्‍ये भाव निर्माण होण्‍यासाठी ही सेवेची संधी मिळाली आहे’, असा भाव ठेवल्‍याने सेवेला प्रारंभ होणे : ‘जून २०२१ मध्‍ये श्री गुरूंच्‍या कृपेने मला भक्‍तीसत्‍संगांच्‍या संहिता लिखाणासाठी साहाय्‍य करण्‍याची संधी मिळाली. ही सेवा मिळाल्‍यानंतर मला पुष्‍कळ आनंद झाला; पण कल्‍प-विकल्‍पात रमणार्‍या मनाने पाय मागे खेचण्‍याचा प्रयत्न केला. माझ्‍या मनात ‘तुला ही सेवा कशी मिळाली ? तुला इतर साधिकांसारखे लिहिता येईल का ? तुला नाही जमले, तर काय ?’, असे नकारात्‍मक विचार आले. त्‍या प्रसंगी मी माझ्‍या मनाला सांगितले, ‘मला ती सेवा जमत नाही; म्‍हणूनच आणि माझ्‍यामध्‍ये भाव निर्माण होण्‍यासाठी मला ही सेवेची संधी मिळाली आहे. मी प.पू. गुरुदेवांना अधिकाधिक शरण जाऊन ही सेवा करीन.’ त्‍यानंतर मनात येणार्‍या विचारांकडे दुर्लक्ष करून, प.पू. गुरुदेवांना संपूर्ण शरण जाऊन आणि आर्तभावाने प्रार्थना करून मी सेवेला आरंभ केला.

१ आ. प्रार्थना करतांना संपूर्ण शरणागती अनुभवता येणे : संहिता लिहितांना किंवा त्‍यामधील सूत्रांचा विस्‍तार करतांना ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना अपेक्षित अशी सेवा होऊ दे’, अशी प्रार्थना होते. ‘सत्‍संग ऐकणार्‍या समस्‍त साधकांचा भाव जागृत होईल आणि त्‍यांना भक्‍तीरसात डुंबता येईल, अशी शब्‍दरचना होऊ दे’, अशीही प्रार्थना होते. ही प्रार्थना करतांना मला संपूर्ण शरणागती अनुभवता येते.

१ इ. ‘सेवा करतांना भगवंतच प्रार्थनेची आठवण करून देऊन तळमळीने सेवा करवून घेत असल्‍याने कर्तेपणा त्‍यागून भगवंतालाच शरण जायला हवे’, हे अनुभवता येणे : प्रार्थनेनंतर भगवंतच मला भावाने ओथंबलेले शब्‍द सुचवतो. कधीकधी लिहिण्‍याच्‍या ओघात बराच काळ प्रार्थना झाली नाही, तर मला सुचणे बंद होते. कधी एखाद्या सूत्राचे लिखाण झाल्‍यानंतर ते रुक्ष वाटते, त्‍यात भाव उतरत नाही. त्‍या वेळी मी पुन्‍हा प्रार्थना केल्‍यावर भगवंत सुचवतो आणि लिखाण पूर्ण होते. यातून ‘सुचणे बंद होणे, लिखाण रुक्ष वाटणे, त्‍यात भाव न उतरणे’, या आणि अशा माध्‍यमांतून भगवंतच प्रार्थनेची आठवण करून देतो अन् माझ्‍याकडून तळमळीने सेवा करून घेतो. त्‍यामुळे ‘स्‍वतःचा कर्तेपणा त्‍यागून भगवंतालाच शरण जायला हवे’, हे मला अनुभवता आले.

१ ई. सेवा गुरुचरणी अर्पण करतांना ‘भगवंता तूच केलेली तुझीच सेवा, तुझ्‍या चरणी तूच अर्पण करून घे आणि तिचा स्‍वीकार होऊ दे’, अशी प्रार्थना होऊन कृतज्ञताभाव जागृत होणे : भक्‍तीसत्‍संगाच्‍या लिखाणाची सेवा पूर्ण झाल्‍यानंतर ती सेवा माझ्‍याही नकळतच श्री गुरु आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या चरणी अर्पण होते. पूर्वी अन्‍य सेवा करतांना ‘सेवा अर्पण करणे’ हा केवळ कर्मकांडाप्रमाणे एक उपचार म्‍हणून केला जात असे. हे सर्व माझ्‍याकडून मानसिक स्‍तरावर होत असे; परंतु आता सेवा गुरुचरणी अर्पण करतांना माझा कृतज्ञताभाव जागृत होतो, तसेच ‘भगवंता तूच केलेली तुझीच सेवा, तुझ्‍या चरणी तूच अर्पण करवून घे. तिचा स्‍वीकार होऊ दे’, अशी प्रार्थना होते.

१ उ. भगवंताला अपेक्षित असे होण्‍यासाठी स्‍वतःच्‍या पूर्ण क्षमतेचा वापर केल्‍यावरच आंतरिक समाधान लाभते.

१ ऊ. भावस्‍थिती दीर्घकाळपर्यंत टिकून रहात असल्‍याचे जाणवणे : ‘संहिता लिखाण करतांना काही वेळा भगवंत असे काही शब्‍द सुचवतो की, ते लिहितांना माझाच भाव जागृत होतो. धारिका कशी आणि कधी लिहून पूर्ण झाली, ते मला कळत नाही. कधी भावस्‍पंदनांचा वेग इतका असतो की, पूर्ण शब्‍द टंकलिखित होण्‍यापूर्वीच माझा भाव जागृत होतो. भावयुक्‍त स्‍पंदने शब्‍दांच्‍या माध्‍यमातून धारिकेत उमटण्‍यापूर्वीच ती माझ्‍या अंतःकरणापर्यंत पोचलेली असतात. अलिकडे ‘अगदी पटकन भावस्‍थितीत जायला होते आणि ही भावस्‍थिती दीर्घकाळपर्यंत टिकून रहाते’, असे मला जाणवते. ही केवळ श्रीगुरूंची कृपाच होय.

१ ए. ‘संहिता लिखाणाच्‍या सेवेमुळे मनातील अपेक्षांचे प्रमाण उणावून स्‍वीकारण्‍याचा भाग वाढला आहे’, असे लक्षात येणे : लिखाण लिहून झाल्‍यानंतर माझ्‍या मनाला ओढ लागते, ती ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सत्‍संगाची संहिता आवडली असेल का ? आणि संहितेमध्‍ये काही चुका असल्‍यास त्‍या जाणून घेण्‍याची !’ तेव्‍हा माझ्‍या मनात ‘संहितेमध्‍ये काही चुका असल्‍यास त्‍या स्‍वीकारून त्‍यामध्‍ये सुधारणा करूया आणि शिकूया’, असे विचार येतात. ही सेवा करतांना भगवंताच्‍या कृपेने ‘मला परिपूर्ण होता यावे, यासाठी भगवंत हे घडवत आहे’, असा भाव ठेवता येतो. यापूर्वी अन्‍य सेवेतील चुका स्‍वीकारतांना माझ्‍या मनाचा संघर्ष होत असे. माझ्‍या मनात ‘चुकांसाठी परिस्‍थिती कशी कारण होती इत्‍यादी अडचणींविषयक स्‍पष्‍टीकरण असायचे’; परंतु संहिता लिखाणाच्‍या सेवेला प्रारंभ केल्‍यापासून अन्‍य सेवा करतांनाही भगवंताने काही चुका किंवा त्रुटी लक्षात आणून दिल्‍यास पुष्‍कळ कृतज्ञता वाटते. ‘मी भगवंताच्‍या चरणांशी जायला हवे’, याची काळजी माझ्‍यापेक्षा भगवंतालाच अधिक आहे; म्‍हणूनच भगवंत मला सेवा अचूक व्‍हावी, यासाठी पदोपदी साहाय्‍य करतो’, ही जाणीव होऊन माझा भाव जागृत होतो. संहिता लिखाणाच्‍या सेवेमुळे माझ्‍या मनातील अपेक्षांचे प्रमाण उणावले असून स्‍वीकारण्‍याचा भाग वाढला आहे.

१ ऐ. संहिता लिखाणाची सेवा करतांना कर्तेपणाचा भाग उणावणे : सेवा करतांना रात्री उशिरापर्यंत जागरण होऊनही माझ्‍या मनाचा उत्‍साह कायम असतो. मनात सतत ‘सेवा वेळेत पूर्ण व्‍हावी’, असेच विचार असतात. रात्री झोपेतही मनात सेवेचेच विचार असतात. यापूर्वीही मनात सेवेविषयी विचार असायचे; पण त्‍या विचारांना कर्तेपणाची झालर असायची. आता कर्तेपणाचा भाग उणावला आहे.

२. अनुभूती

२ अ. साधिका आणि सहसाधिका दोघींच्‍याही मनात एकच विचार येणे अन् दोघींनाही एकाच वेळी एकमेकींचे स्‍मरण होणे : ‘संहिता लिखाणाची सेवा करणार्‍या सहसाधिकेशी चर्चा करून पुढील लिखाण करायला हवे’, असा विचार माझ्‍या मनात आला असेल, त्‍याच वेळी सहसाधिकेलाही माझी आठवण येते किंवा दोघींच्‍याही मनात एकच विचार येतो. ही अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे.

२ आ. संहिता लिखाण करतांना स्‍वतः लिहिलेले आणि वाचलेले शब्‍दही भक्‍तीसत्‍संग ऐकतांना आठवत नसणे आणि ‘कुणी दुसर्‍यानेच हे लिखाण केले असून, मी ते प्रथमच ऐकत आहे’, असे वाटणे : ‘सत्‍संगाची संहिता लिखाण करतांना मी लिहिलेले आणि पुनःपुन्‍हा वाचलेले शब्‍दही प्रत्‍येक गुरुवारी होणारा भक्‍तीसत्‍संग ऐकतांना मला आठवत नाहीत. ‘कुणी दुसर्‍यानेच हे लिखाण केले आहे आणि मी ते प्रथमच ऐकत आहे’, असे मला वाटते. त्‍या वेळी माझा भाव जागृत होतो आणि भावाश्रू येतात. ही अनुभूती मी जून २०२१ पासून अनेकदा घेतली आहे. नवरात्रीच्‍या कालावधीत सलग ९ दिवस होणार्‍या भक्‍तीसत्‍संगांमध्‍येही दिवसरात्र सेवा करूनही मला सत्‍संग ऐकतांना नवीनच वाटत होता.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या कृपेने आणि कु. वैष्‍णवी वेसणेकर (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) हिच्‍या सहकार्याने मला ही सेवा करायला मिळाली. यासाठी कोटीशः कृतज्ञता ! ‘ही स्‍थिती वृद्धींगत होत राहो’, हीच प्रार्थना !’

– श्रीमती अलका वाघमारे (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक