आपण सर्वांनीच लहानपणी एका माकडाची गोष्ट ऐकली असेल. ते माकड त्याच्या पिल्लासह पुरात अडकलेले असते. जसजसे पाणी वाढत जाते, तसतसे ते माकड आणि त्याचे पिल्लू दोघेही घाबरू लागतात. शेवटी जेव्हा दोघेही बुडतील, अशी स्थिती येते, तेव्हा माकडाची स्वार्थी वृत्ती जागृत होते आणि ते पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्या पिल्लाच्या डोक्यावर पाय ठेवून सुरक्षित ठिकाणी उडी मारून सुखरूप बाहेर पडते अन् बिचारे पिल्लू बुडून मरते. वेळप्रसंगी स्वार्थ किती पराकोटीचा असतो, हे दर्शवणारी ही गोष्ट आहे. यातून स्वहितासाठी स्वकियांचीच हानी करण्याची घातकी प्रवृत्ती दिसून येते. अशी प्रवृत्ती केवळ प्राण्यांमध्ये असते असे नाही, तर मनुष्य प्राण्यामध्येही आढळते. याचीच प्रचीती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संपूर्ण देशाला दिली. नितीश कुमार यांनी बिहारमधील ‘अतिक अहमद’सारखा समजला जाणारा मोठा गुंड आनंद मोहन याची शिक्षा पूर्ण होण्याच्या ४ वर्षांच्या अगोदरच कारागृहातून सुटका केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी या गुंडाच्या सुटकेसाठी चक्क कायदाच पालटला ! या प्रकारामुळे अनेकांना काँग्रेसने शहाबानो प्रकरणात रातोरात कायदा पालटल्याच्या घटनेची आठवण झाली असेल. एरव्हीही लोकशाहीची गळचेपी झाल्याची ओरड करणारे तथाकथित लोकशाहीप्रेमी आता लोकशाहीची उघड उघड हत्या होत असतांना कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ? हे कळायला मार्ग नाही. आनंद मोहन याची पार्श्वभूमी अत्यंत हिंसक आहे. वर्ष १९९४ मध्ये गोपालगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी. कृष्णैय्या (वय ३५ वर्षे) यांची समुहाद्वारे अमानुष मारहाण करून आणि नंतर गोळी मारून हत्या करण्यात आली होती. कृष्णैय्या हे एक अत्यंत कर्तव्यदक्ष ‘आय.ए.एस्.’ अधिकारी म्हणून ओळखले जात होते. ज्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्य नागरिकांची स्थिती काय असेल ? याचा विचारच न केलेला बरा ! ‘बिहारला जंगलराज का म्हणतात ?’, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. कृष्णैय्या हे दलित वर्गातील होते. काही वर्षांपूर्वी रोहित वेमुल्ला या दलित युवकाच्या आत्महत्येला थेट केंद्र सरकारला उत्तरदायी धरत देशात आकाश-पाताळ एक करणार्या काँग्रेसचे कृष्णैय्या प्रकरणात ‘दलितप्रेम’ कुठे गेले ? हे जनतेला कळले पाहिजे. आनंद मोहन याने त्याचा सहकारी असलेल्या एका गुंडाच्या मृत्यूला कृष्णैय्या यांना उत्तरदायी ठरवून त्यांची हत्या केली. त्यामुळे त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. वर्ष १९९६ मध्ये त्याने कारागृहात असतांनाही सिहोर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली ! लोकशाहीची यापेक्षा मोठी विटंबना दुसरी कुठली असू शकेल. विशेष म्हणजे त्याला उमदेवारी दिली होती ती तत्कालीन समता पक्षाने, म्हणजेच आजच्या नितीश कुमार यांच्या पक्षाने ! याच विजयामुळे गुंड आनंद मोहन याचे मनोबल वाढले. कृष्णैय्या यांच्या हत्येच्या प्रकरणी वर्ष २००७ मध्ये बिहारमधील कनिष्ठ न्यायालयाने आनंद मोहन याला फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेला त्याने पाटणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. पाटणा उच्च न्यायालयाने वर्ष २००८ मध्ये त्याच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयानेही त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. शिक्षा झाल्यामुळे आनंद मोहन हा निवडणूक लढवू शकत नव्हता. तरीही त्याची दहशत इतकी होती की, कारागृहात असूनसुद्धा त्याने वर्ष २०१० मध्ये त्याची पत्नी लवली मोहन हिला काँग्रेसकडून आणि वर्ष २०१४ मध्ये समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली. आज आनंद मोहन याचा मुलगा हा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा आमदार आहे. ‘गुंडाच्या दबावाला घाबरून त्याच्या नातेवाइकांना उमेदवारी देणार्या पक्षांमुळे लोकशाही धोक्यात येत नाही का ?’, असा प्रश्न जनतेने या पक्षांना विचारायला हवा. ही सर्व पार्श्वभूमी सांगण्यामागचा उद्देश इतकाच की, आपण किती मोठ्या गुंडाची सुटका करत आहोत, याचे पुरेपूर भान असूनही नितीश कुमार यांनी ही खेळी खेळली. त्यासाठी १० एप्रिल २०२३ या दिवशी कारागृहाच्या नियमावलीतील ‘कारागृहात कितीही चांगली वर्तणूक असली, तरी सरकारी अधिकार्याची हत्या करणार्या बंदीवानांची सुटका करू नये’, ही अटच काढली. त्यामुळे आनंद मोहन याची शिक्षा संपायला ४ वर्षे शेष असतांनाच त्याची सुटका झाली. जानेवारी २०२३ मध्ये नितीश कुमार हे राजपूत समाजाच्या एका कार्यक्रमात गेले असता तेथे आनंद मोहन याच्या सुटकेच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. तेव्हा नितीश कुमार यांनी ‘तुम्ही त्याची काळजी करू नका. मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे’, असे सूचक उत्तर दिले होते, म्हणजे तेव्हापासून हे प्रयत्न करण्यात येत होते, हे उघड आहे. नितीश कुमार यांच्या या ‘औदार्या’चा बिहारमधील गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या २६ जहाल आरोपींनाही थेट लाभ होणार आहे. यांतील ७ आरोपी तर असे आहेत, ‘ज्यांची सुटका केल्यास ते पुन्हा गंभीर गुन्हे करतील’, असे सरकारचेच मत आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. बिहारमधील हा आनंदी ‘आनंद’ समाजहिताचा निश्चितच नाही.
केवळ राजकीय स्वार्थ !
बिहारमध्ये भाजपने साथ सोडल्याने नितीश कुमार यांना आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव होण्याची भीती आहे. अशात मोठ्या प्रमाणात मते असणार्या राजपूत समाजाला प्रसन्न करण्यासाठीच राजपूत असलेला गुंड आनंद मोहन याची सुटका करण्यात आली. अशा प्रकारे बंदीवानांची सुटका करण्याचे कायदे करण्याचे अधिकारच कुणाला नसावेत, अन्यथा लोकशाहीचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे. एकूणच नितीश कुमार यांनी स्वहितासाठी समाजहिताची त्या प्रकारे हत्या केली, ज्या प्रकारे वरील गोष्टीतील माकडाने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या पिल्लाची हत्या केली ! लोकशाहीचा यापेक्षा दारूण पराभव दुसरा कुठला असू शकतो ? आनंद मोहन आणि नितीश कुमार या दोघांनीही हत्या केली आहे, एकाने कृष्णैय्या यांची, तर दुसर्याने लोकशाहीची ! त्यामुळे समाजाच्या दृष्टीने दोघेही समान गुन्हेगार आहेत, यात शंका नाही !
राजकीय स्वार्थासाठी अटकेतील आरोपीची सुटका करणारे राजकीय पक्ष समाजघातकीच होत ! |