‘भोजन कसे करावे ? याचेही एक शास्त्र आहे, जे आपल्याला कुणीही आणि कधीही शिकवलेले नाही. जेवण्याच्या संदर्भात आपण विविध चुका करत असतो. आज आपण भोजनाच्या संबंधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम शिकून घेणार आहोत. या नियमांचे पालन केले, तर आपण निश्चितच निरोगी राहू शकतो.
१. गरम आणि ताजे भोजन ग्रहण करण्याचे महत्त्व
गरम आणि ताजे अन्न ग्रहण केले, तर अन्नाची उत्तम चव लागते. असे अन्न आपल्या शरिरात गेल्यावर आपला जठराग्नीही प्रदीप्त होतो. या अन्नाचे पचनही उत्तम रितीने होते. याउलट थंड झालेले किंवा शीतकपाटामधून काढलेले अन्न ग्रहण केल्याने त्याचे आपल्याला लाभ होण्याऐवजी विपरीत परिणामच भोगावे लागतात. गृहिणींच्या संदर्भात असे लक्षात येते की, त्या सकाळी लवकर सर्वांचा डबा करतात. त्यानंतर सर्व कामे आटोपल्यावर दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास गार झालेले अन्न जेवतात. अशा भोजनाचा त्यांना आवश्यक तसा लाभ होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनीही घरातील अन्य सदस्यांसमवेतच गरम आणि ताजे भोजन करण्याचा प्रयत्न करावा.
२. स्निग्ध भोजन का करावे ?
स्निग्ध भोजन, म्हणजे व्यवस्थित शिजवलेले, तेल, तूप, खोबरे, तीळ आणि शेंगदाणे असे स्निग्ध पदार्थ वापरून केलेला स्वयंपाक. स्वयंपाक करतांना आवश्यक ते सर्व जिन्नस घालून केलेले पदार्थ रूचकर लागतात. त्यामुळेही स्वतःचा जठराग्नी प्रदीप्त होतो. आपण प्रतिदिन केवळ वाफवलेल्या भाज्या सेवन केल्या, तर असा आहार आपण फार दिवस घेऊ शकणार नाही. त्यामुळे स्वयंपाक करतांना स्वतःचे कौशल्य वापरून पदार्थ रूचकर आणि आरोग्यास हितकर होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करायला हवेत. आता पदार्थ रूचकर करायचे, म्हणजे भरपूर तेल किंवा मसाले घालायचे, असा अर्थ येथे अपेक्षित नाही.
३. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत भोजन करण्याचे लाभ
योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत भोजन केले पाहिजे. योग्य प्रमाणात भोजन केल्याने आपले वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष सम प्रमाणात रहातात अन् आपण निरोगी रहातो. योग्य प्रमाणात घेतलेला आहार व्यवस्थित पचतो. त्यामुळे सर्व धातूंची निर्मितीही व्यवस्थित होते. जेव्हा आपण योग्य प्रमाणात भोजन केले पाहिजे, असे म्हणतो, तेव्हा ते योग्य प्रमाणात आहे, हे कसे ठरवायचे ? आहाराचे प्रमाण हे त्या व्यक्तीचे वय, अन्न पचवण्याची क्षमता, व्यवसाय, श्रम आणि आहाराचे स्वरूप इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते.
अ. वयस्क व्यक्तींचा आहार अल्प, तर तरुणांचा आहार अधिक असतो.
आ. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील व्यक्तींना दिवसभर बसून काम करायचे असते. त्यामुळे त्यांनी अल्प प्रमाणात आहार घ्यावा. याउलट जे कष्टाची कामे करतात, त्यांनी अधिक प्रमाणात आहार घेण्यास हरकत नाही.
इ. पुरी-भाजी, कडधान्यांच्या उसळी इत्यादी पचायला जड असणारे पदार्थ अल्प प्रमाणात सेवन करावे, तर पचायला हलक्या पदार्थांचे प्रमाण तुलनेने अधिक असावे.
ई. प्रत्येकाने अन्नाचे प्रमाण ठरवणे : अन्न पचवण्याच्या क्षमतेवरूनही आहार निश्चित करायचा असतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे अन्न लवकर, तर कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे अन्न त्या मानाने उशिरा पचते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला आहाराचा एकच नियम लावता येणार नाही. प्रत्येकाने आपापली प्रकृती, वय, व्यवसाय, खाण्याचा पदार्थ यावरून अन्नाचे प्रमाण ठरवायला हवे.
आपल्या पोटाचे ४ समभाग केले, तर त्यातील २ भाग भोजन करावे. एक भाग द्रव पदार्थांसाठी ठेवावा आणि उर्वरीत एक भाग रिकामा ठेवावा. सध्या आयुर्वेदाचा हा नियम सर्वांना ठाऊक आहे; पण हे भाग कसे ठरवावे ? हा प्रश्न अनेकांना असतो. जेवण केल्यानंतर आपल्या शरिरात कशी लक्षणे दिसतात ? यावरून आपण जेवण अल्प कि अधिक केले ? याचे अनुमान होऊ शकते. योग्य प्रमाणात भोजन केले, तर दिसणारी लक्षणे येथे देत आहे.
उ. योग्य प्रमाणात भोजन केल्याची लक्षणे : ज्या मात्रेत भोजन केल्यामुळे आपल्या पोटामध्ये त्रास होत नाही, हृदयावर दाब येत नाही, पोटावर ताण पडून ते फारसे जड वाटत नाही, आपली सर्व इंद्रिये प्रसन्न रहातात; बसणे, उठणे, झोपणे, उभे रहाणे, फिरणे, श्वासोच्छ्वास करणे, हसणे या सर्व क्रिया सुखदायक होतात आणि जेवण व्यवस्थित पचल्यानंतर मल-मूत्रांचे योग्य वेळी निस्सारण होते. ही लक्षणे आपल्यामध्ये दिसल्यास आपण योग्य प्रमाणात आहार घेत आहोत, हे लक्षात येईल.
ऊ. भोजनाच्या योग्य वेळा : भोजनाची योग्य वेळ सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत असावी. रात्रीचे भोजन लवकर केले, तर ते नीट पचते. त्यामुळे दुसर्या दिवशी उत्साह जाणवतो.
४. पूर्वीचा आहार पचल्यावरच भोजन करावे
बर्याचदा असे होते की, भूक नसतांनाही केवळ जेवणाची वेळ झाली आहे; म्हणून आपण भोजन करतो. त्यामुळे जठराग्नीचे पूर्वीचे काम संपलेले नसतांनाच आपण परत कामाचा ताण त्या अग्नीवर सोपवतो; म्हणून अन्नाचे पचन नीट घडून येत नाही. परिणामी पोट जड असणे, आळस निर्माण होणे, निरुत्साह, पोट फुगणे, आम्लपित्ताचा त्रास होणे अशा तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे कडकडीत भूक लागल्याखेरीज पुढचा आहार घेऊ नये.
५. विरुद्ध आहार घेणे टाळा !
ज्या दोन पदार्थांचे गुणधर्म परस्परविरोधी आहेत, असे पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजे. उदा. दूध आणि मासे, दूध-आंबट फळे इत्यादी. पदार्थांवर केलेल्या अयोग्य संस्कारामुळेही आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोे. उदा. दही गरम करून खाणे. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर बिर्याणी या अन्नपदार्थामध्ये चिकन, मटण किंवा पनीर यांना दही आणि मसाला लावून काही वेळ ठेवले जाते. नंतर हे पदार्थ शिजवतांना गरम केले जातात. अजून एक उदाहरण म्हणजे पनीर मसाला. पनीर हे दूध नासवून केलेले असते. त्यात आपण तिखट, मीठ, मसाला घालून केलेली भाजी म्हणजे विरुद्ध अन्नच. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. तेव्हा असे पदार्थ आपल्या आहारात वारंवार येणार नाहीत, याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी.
६. योग्य जागी बसून आणि योग्य उपकरणांचा उपयोग करून भोजन करावे
पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातच जेवायला बसत असत. जिथे जेवणार तेथील जागा, प्रसन्न, शांत आणि स्वच्छ असावी. सध्या बरेच जण टिव्हीसमोर किंवा सोफ्यावर बसून जेवण करतांना दिसून येतात. ते अयोग्य आहे. आता योग्य उपकरणांचा उपयोग करून म्हणजे काय ? तर ज्या भांड्यांचा उपयोग आपण करणार ती स्वच्छ असावीत. दुसरा विचार आपण असाही करू शकतो की, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा नॉनस्टिकच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्याऐवजी लोखंडी, स्टील यांच्या भांड्यांचा उपयोग कसा करू शकतो, यादृष्टीने सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.
७. अतीघाईने जेवू नये
‘लवकर निघायचे आहे’, ‘जेवणाची वेळ (लंच टाईम) मर्यादितच आहे’, अशा धावत्या जीवनशैलीमध्ये अतीघाईने जेवणे, हे नित्याचेच झालेले आहे.
अशा जेवणामुळे आपल्या अन्नपचनाच्या तक्रारी वाढलेल्या दिसून येतात. आपल्या अन्नपचनाचा प्रारंभ हा जिभेपासूनच होत असतो. आपण घाईत जेवल्याने आपली लाळ अन्नामध्ये नीट मिसळत नाही. असे घाईघाईने घेतलेले अन्न योग्य प्रक्रिया न झाल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम करते.
८. पुष्कळ वेळ रेंगाळत जेवू नये
याचसमवेत जेवायला अधिक वेळ लावल्याने जेवण थंड होते. परिणामी त्यातील रूची अल्प होते आणि त्यामुळे त्याचे योग्य पचन होत नाही.
९. जेवतांना बोलू नये
जेवतांना बोलल्याने काय आणि किती मात्रेत आहार घेत आहोत, याचे आपल्याला भान रहात नाही. जेवतांना बोलल्याने एखाद्या वेळेस अन्नाचा कण श्वासनलिकेत जाऊन ठसका लागण्याची शक्यताही असते; म्हणून जेवतांना शक्यतो बोलू नये.
१०. प्रसन्न मनाने आणि एकाग्रतेने जेवावे
आपल्या शास्त्रामध्ये ‘भोजन म्हणजे फक्त पोट भरणे नसून ते एक यज्ञकर्म आहे’, असे म्हटलेले आहे. जेवतांना भीती, काळजी, राग हे मानसिक भाव बाजूला ठेवून ‘देवाने आपल्याला हे अन्न दिलेले आहे’, याविषयी कृतज्ञ राहून अन्न ग्रहण करावे. असे केल्याने आपण किती जेवत आहोत ? आणि काय जेवत आहोत ? आणि ते आपल्यासाठी योग्य आहे का ? या सर्वांचा विचार होतो अन् परिणामी आपले आरोग्य अबाधित रहाते.
जेवतांना आपण सर्व चवीचे (गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट) पदार्थ आहारात घेत आहोत ना ? याचा विचार व्हायला हवा. अशा पद्धतीने आपण जेवणाचे हे १० नियम वाचले. या नियमांचे पालन करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.’
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२१.४.२०२३)
(साभार : ‘पंचम वेद-आयुर्वेद’ यू ट्यूब वाहिनी)