अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी कागदपत्रांवरील औरंगाबाद नाव पालटू नका ! – मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्‍ह्याचे नाव पालटून छत्रपती संभाजीनगर करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता दिली होती; मात्र याच निर्णयाच्‍या विरोधात मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करतांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ‘नामांतराविषयी अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत औरंगाबादचे नाव सरकारी कागदपत्रांवर पालटू नका’, अशा सूचना केल्‍या आहेत. संभाजीनगर नामांतराच्‍या सूत्रावरील याचिकेवरील सुनावणी ७ जूनपर्यंत स्‍थगित करण्‍यात आली आहे.

औरंगाबाद आणि उस्‍मानाबाद या २ शहरांची नावे पालटण्‍याच्‍या निर्णयाविरोधात उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. औरंगाबादच्‍या नामांतराच्‍या विरोधात प्रविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या याचिकेवर २४ एप्रिल या दिवशी मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली आहे. या वेळी ‘मुसलमानबहुल विभागात नावे तातडीने पालटण्‍याची जणू मोहीमच हाती घेतली आहे’, असा आरोप याचिकाकर्त्‍याने न्‍यायालयात केला. यावर सुनावणी करतांना उच्‍च न्‍यायालयाने वरील निर्णय दिला.