जळगाव येथील सौ. वेदांती उदय बडगुजर यांची त्‍यांचे पती श्री. उदय बडगुजर यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

वैशाख शुक्‍ल द्वितीया (२२.४.२०२३) या दिवशी जळगाव येथील श्री. उदय बडगुजर आणि सौ. वेदांती उदय बडगुजर यांच्‍या विवाहाचा १२ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त श्री. उदय बडगुजर यांना पत्नी सौ. वेदांती बडगुजर यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. वेदांती बडगुजर

१. मुलावर चांगले संस्‍कार करणे

‘मुलगा सोहम्‌वर लहानपणापासून आध्‍यात्‍मिक संस्‍कार व्‍हावेत’, यासाठी ती त्‍याला श्रीकृष्‍ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या कथा सांगायची, तसेच त्‍याच्‍याकडून प्रार्थना, श्‍लोक अन् नामजप म्‍हणून घ्‍यायची.

श्री. उदय बडगुजर

२. स्‍वतःची प्रकृती बरी नसतांनाही पतीला गुरुसेवेला प्राधान्‍य देण्‍यास सांगणे

वर्ष २०१५ मध्‍ये घरी असतांना वेदांतीला एक अपघात होऊन जखम झाली होती. त्‍याच कालावधीत जळगाव येथे मला एक सेवा होती. तेव्‍हा ती मला म्‍हणाली, ‘‘तुम्‍ही तिकडे सेवा करा. ती सेवा कोणाला हस्‍तांतरितही करता येणार नाही. तुम्‍ही सेवेला महत्त्व द्या.’’ वास्‍तविक तिला पुष्‍कळ त्रास होत होता, तरी तिने तो त्रास स्‍वीकारला होता. त्‍या वेळी तिला माझ्‍या आधाराची आवश्‍यकता होती, तरीही तिने मला सेवेला पाठवले. भावनेत न अडकता तिने सेवेला प्राधान्‍य दिले.

३. आसक्‍ती नसणे

वर्ष २०१६ मध्‍ये गावी गेलो असतांना आमच्‍या घरी चोरी झाली. त्‍यात तिचे लग्‍नाचे सर्व दागिने चोरीला गेले. त्‍यामुळे पुष्‍कळ हानी झाली असली, तरी ती त्‍या प्रसंगात अडकून राहिली नाही. ‘कदाचित् देवाने आपले प्रारब्‍ध न्‍यून केले’, असे ती म्‍हणाली.

४. परेच्‍छेने वागणे

त्‍या प्रसंगानंतर मी तिला माझी पूर्णवेळ साधना करण्‍याची इच्‍छा बोलून दाखवली. तेव्‍हा तिने माझ्‍या या निर्णयाला लगेच संमती दिली आणि तीही पूर्णवेळ साधना करायला लागली. त्‍या वेळी ‘माहेरचे काय म्‍हणतील ?’, असा विचार तिच्‍या मनात आला नाही.

५. सेवाभाव

देवद आश्रमात सेवेला गेल्‍यावर तिला वयस्‍कर साधक आणि संत यांच्‍या सेवेची संधी मिळाली. ती सेवा तिने आनंदाने स्‍वीकारली. त्‍यात तिच्‍याकडे पू. नेनेआजी (सनातनच्‍या ३६ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेनेआजी) आणि पू. दळवीआजी (सनातनच्‍या ७७ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती सत्‍यवती दळवीआजी) यांची सेवा पूर्णवेळ होती. परात्‍पर गुरु पांडे महाराज आणि सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांची सेवा प्रतिदिन काही घंटे होती. तिने सेवेच्‍या माध्‍यमातून संतांचे मन जिंकले.

६. पतीला साधनेत साहाय्‍य करणे

अनेकदा माझ्‍या मनाची नकारात्‍मकता वाढायची. त्‍या वेळी ती मला समजून घेऊन त्‍या स्‍थितीतून बाहेर काढण्‍यासाठी प्रयत्न करायची. मला भावनिक स्‍तरावर न हाताळता आध्‍यात्‍मिक दृष्‍टीकोन देऊन ‘गुरुदेवांना काय अपेक्षित आहे ?’, याचा विचार करून ती मला साहाय्‍य करायची.

७. अन्‍य गुण

‘प्रेमभाव, इतरांशी जवळीक करणे, स्‍पष्‍ट बोलणे, व्‍यवस्‍थितपणा, इतरांना साहाय्‍य करणे, पुढाकार घेऊन कृती करणे, समर्पणभाव, आज्ञापालन, शिकण्‍याची वृत्ती असणे’, असे अनेक गुण तिच्‍या कृतीतून शिकायला मिळतात.

परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो की, त्‍यांच्‍या कृपेने अशी सहचारिणी माझ्‍या जीवनात आली आणि आम्‍हाला साधनेची संधी मिळाली. ‘श्रीकृष्‍णा, आम्‍हा दोघांकडून गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करून घे. आम्‍हाला साधनारत ठेव आणि आमच्‍यावर अखंड गुरुकृपा राहू दे’, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना !’

– श्री. उदय बडगुजर, जळगाव (८.४.२०२३)