सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च

पुरातत्व विभागाच्या रत्नागिरी येथील कार्यालयाकडून देण्यात आली माहिती

वेंगुर्ला – युनेस्कोच्या सूचित समाविष्ट असलेल्या यशवंतगडाची डागडुजी करणे आणि नवीन चिर्‍याचे बांधकाम करणे यांकरता आतापर्यंत शासनाकडून ५ कोटी ५८ लाख ४५ सहस्र ८४५ रुपये निधी पूर्णपणे खर्ची पडला आहे, अशा माहितीचे पत्र  महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. वि.पुं. वाहणे यांनी येथील शिवप्रेमी राजन रेडकर यांना दिले आहे.

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर

शिवप्रेमी श्री. रेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी यापूर्वी यशवंतगडाच्या नजीक झालेले अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधात आवाज उठवला होता. तसेच हे कृत्य करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी उपोषण केले होते. या अनुषंगाने श्री. रेडकर यांनी पुरातत्व खात्याने यशवंत गडाच्या संवर्धनासाठी आतापर्यंत किती निधी खर्च केला याची माहिती मागितली होती.

‘‘पुरातत्व खात्याने केलेला खर्च गावातील किती लोकांना ठाऊक आहे ? जनता जो कर भरते, त्याचा विनियोग कसा होतो ? त्याकडे प्रत्येक गावातील नागरिकांचे लक्ष हवे. सर्वसाधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होत असतांना स्थानिकांना त्याविषयी माहितीही नसावी, हे आश्चर्यकारक आहे. या खर्चाला शासकीय भाषेत काय म्हणायचे ?’’, असा संतप्त प्रश्न श्री. रेडकर यांनी उपस्थित केला आहे.

काहींच्या म्हणण्यानुसार शिवप्रेमी यशवंतगडाचे संवर्धन आणि जतन होण्यासाठी येथे कार्यरत असतात. सध्या गडावर स्वच्छता दिसते, त्यात शिवप्रेमींचा त्याग मोठा आहे. शिवप्रेमी सातत्याने येथे कार्यरत नसतात, तर पुरातत्व खात्याने या गडाची अशी निगा राखली असती का ?  हा मोठा प्रश्न आहे.

संपादकीय भूमिका

पुरातत्व खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे शासन यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने अवैधरित्या उत्खनन आणि बांधकाम केले जात असतांना पुरातत्व खाते त्याकडे दुर्लक्ष करते. यामुळे गडाची पडझड होऊन शासनाचा पैसा वाया जाणार नाही का ?


सविस्तर वृत्त वाचा –

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाजवळ आजपासून बेमुदत उपोषण !
https://sanatanprabhat.org/marathi/655721.html