राजापूर – लोकसहभागातून येथील नद्यांतील गाळ उपशाचे काम केले जात आहे. काही दायित्वशून्य नागरिक आणि व्यापारी यांच्याकडून मात्र घनकचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम २०१६ चे उल्लंघन केले जात आहे. नदीपात्रात, तसेच उघड्यावर कचरा टाकणार्यांवर आता राजापूर नगर परिषद प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
राजापूर येथे प्रतिवर्षी पावसाळ्यात पूर येतो. त्यावर मात करण्यासाठी येथील कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम लोकसहभागामधून चालू करण्यात आले आहे. यामुळे येथील पूराची तीव्रता अल्प होणार असून त्याचा लाभ नागरिकांनाच होणार आहे.
काही दायित्वशून्य नागरिक नदीपात्रात आणि उघड्यावरच कचरा टाकत आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. परिसर अस्वच्छ होत असल्याच्या तक्रारीही नगर परिषद प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडील सर्व कचरा हा नगर परिषदेच्या घंटागाडीवर वर्गिकृत स्वरूपात (ओला कचरा, सुका कचरा) द्यावा. उघड्यावर कचरा टाकून शहराच्या सौंदर्यास बाधा आणू नये, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यापुढे कचरा उघड्यावर किंवा नदीपात्रात टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यापार्याचा व्यवसाय परवाना, हातगाडी परवाना रहित करण्यात येईल, तसेच संबंधित नागरिकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.