काँग्रेसने देशाचा इतिहास स्वत:ला हवा तसा लिहून घेतला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘वीर सावरकर – फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !

डावीकडून आमदार नीतेश राणे, खासदार राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, लेखक उदय माहुरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. उदय निरगुडकर, रणजित सावरकर, आमदार आशिष शेलार

मुंबई – काही माणसे इतिहास घडवतात, तर काही माणसे इतिहास पळवतात. काँग्रेसने या देशाचा इतिहास पळवला आणि स्वत:ला पाहिजे तसा लिहून घेतला. मागील ६० वर्षांत काँग्रेसने इतिहासाची केवळ एकच बाजू दाखवली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’मध्ये ‘वीर सावरकर – फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

१. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रभक्ती, बलीदान, त्याग शब्दातीत आहे. काही लोक जाणीवपूर्वक त्यांची अपकीर्ती करत आहेत. काँग्रेसने त्यांच्या अपकीर्तीची मोहीम उघडली आहे. संधी मिळेल, तेथे ते या महान राष्ट्रपुरुषाचा अपमान करण्याचे पाप करत आहेत. अशा काळात या पुस्तकाचा मराठी अनुवाद आवश्यक होता.

२. केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित हे या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि डॉ. उदय निरगुडकर यांच्या संयुक्त विद्यमाने २० एप्रिलला हा कार्यक्रम घेण्यात आला.

३. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे मूळ लेखक उदय माहुरकर, प्रमुख वक्ते म्हणून आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, सन्माननीय अतिथी म्हणून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे यांसह आमदार नीतेश राणे, आमदार सदा सरवणकर उपस्थित होते.

सावरकर यांच्या विचारांमुळे भारत वेगाने महासत्ता होईल ! – उदय माहुरकर, केंद्रीय माहिती आयुक्त, केंद्रशासन

स्वातंत्र्यवीर सावरकर हे ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयाचे पितामह होते. चीनच्या धोक्याची त्यांनी केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. गौतम बुद्ध यांच्या निर्वाणानंतर काही वर्षांनी त्यांची ओळख जगाला झाली. त्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख राष्ट्राला होत आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कर्तृत्व डावलल्याने देशाची मोठी हानी झाली. आता सावरकरयुगाला प्रारंभ झाला आहे. त्यांच्या विचारांवर चाललो, तरच भारत वेगाने महासत्ता होईल.

पुस्तकाचे प्रकाशन हा माझ्यासाठी कृतज्ञता सोहळा ! – डॉ. उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक

माझे आजोबा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घनिष्ठ संबंध होते. या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे माझ्यासाठी कृतज्ञतेचा सोहळा आहे.

आमदार आशिष शेलार यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेणे, ही राष्ट्राची आवश्यकता आहे’, असे सांगितले. आमदार अतुल भातखळकर यांनीही त्यांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रणजित सावरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. स्वप्नील सावरकर यांनी केले. ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.