सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपालिकेकडून पाण्याची चोरी रोखण्यासाठी फिरत्या पथकाची नियुक्ती

सावंतवाडी नगरपालिका

सावंतवाडी – शहर नगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत चालू आहे. त्यामुळे कुणीही अवैधरित्या थेट जलवाहिनीला पंप जोडून पाणी घेऊ नये. शहरात असे प्रकार होतात का ? हे पहाण्यासाठी, तसेच पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी नगरपालिकेने फिरते पथक नेमले आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिली.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात जावडेकर यांनी म्हटले आहे की, यावर्षी विशिष्ट वातावरणामुळे राज्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. नळ जोडणीच्या ठिकाणी पाण्याची गळती होत असल्यास ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी. शहरातील काही भागात अल्प दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच पाण्याची चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास नेमलेल्या पथकाच्या माध्यमातून थेट कारवाई करण्यात येणार आहे. सध्या शहरात पाणीटंचाईची भीती नाही.

संपादकीय भूमिका

  • पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीची चोरी होते, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचे परिणाम ! समाजाला धर्मशिक्षण दिले, तर त्यांच्यात आपसूकच नैतिकता निर्माण होते, हे लक्षात घेऊन शासनाचे लोकांना धर्मशिक्षण द्यावे !
  • पाण्याची चोरी रोखण्यासाठी पथक नेमावे लागते, हे भारतीय समाजाला लज्जास्पद !