केमिस्ट्र अँड ड्रगिस्ट संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
मुंबई – राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी औषध विक्रेत्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट्र अँड ड्रगिस्ट संघटने’ने केला आहे. याविषयी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली आहे.
‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट्र अँड ड्रगिस्ट संघटने’चे सचिव अनिल नावंदर यांनी अन्न आणि औषध विक्रेत्यांकडून झालेल्या छोट्या-छोट्या त्रुटी मिटवण्यासाठी संजय राठोड यांचे खासगी सचिव डॉ. विशाल राठोड आणि विशेष कार्य अधिकारी संपत डावखरे अन् चेतन करोडीदेव औषध विक्रेत्यांकडे पैसे मागत असल्याचा आरोप केला आहे.
औषध विक्रेता संघाने योग्य कारवाईसाठी सहकार्य करावे ! – संजय राठोड, मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन
क्षेत्रीय अधिकार्याने कारवाई केल्यानंतर प्रकरण मंत्रालयात येते. ‘खालच्या अधिकार्यांनी केलेली कारवाई चुकीची आहे’, असे समजून कारवाई थांबवल्यास अधिकार्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होते. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात मी विचार करून निर्णय देतो. ‘सुनावणी न घेता स्थगिती द्यावी’, अशी मागणी संघटना करते. कारवाई झालेली ७ सहस्र दुकाने आहेत. औषधालयांमध्ये किराणा दुकानांसारखी औषधे विकली जातात. यावर सरकारचे नियंत्रण हवे. नशेची औषधे आणि ‘सेक्स’ची औषधे विकून पैसा कमवला जातो, अशा तक्रारी आहेत. मंत्रालयातील अवर सचिव विवेक कांबळे यांचा ‘ओरोफर’ या औषधामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे औषध विक्रेता संघाने योग्य कारवाईला विरोध करू नये. भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांच्या पाठीशी न रहाता शासनास सहकार्य करावे.
संपादकीय भूमिकाजनतेच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकाराचे सरकारने सखोल अन्वेषण करावे ! |