‘सनातन प्रभात’साठी २४ वर्षे तन-मन-धनाचा त्‍याग करून आदर्श निर्माण करणारे कै. मोहन बेडेकरकाका आणि त्‍यांचे कुटुंबीय !

कै. मोहन बेडेकर

‘२८.११.१९९९ या दिवशी ‘सनातन प्रभात’ची रत्नागिरी आवृत्ती चालू झाली. त्‍या काळात मोहन बेडेकरकाकांनी त्‍यांची वास्‍तू निःसंकोचपणे ‘सनातन प्रभात’चे कार्यालय चालू करण्‍यासाठी दिली. तेव्‍हापासून आजपर्यंत २४ वर्षे या वास्‍तूत ‘सनातन प्रभात’च्‍या कार्याची ज्‍योत अखंडपणे तेवत राहिली. याचे श्रेय बेडेकरकाकांचा त्‍याग आणि समर्पणभाव यांना जाते. ‘सनातन प्रभात’साठी काकांनी केवळ त्‍यांच्‍या वास्‍तूचा त्‍याग केला नाही, तर जिल्‍ह्यात ‘सनातन प्रभात’च्‍या कार्याचा विस्‍तार होण्‍यासाठीही प्रयत्न केले. दैनिकासाठी करावयाच्‍या दैनंदिन कार्यामध्‍ये सहभाग घेऊन त्‍यांनी हे धर्मकार्य केले. त्‍यांचे हे कार्य म्‍हणजे जणू द्वितपपूर्तीच !

मृदूभाषी आणि अहंशून्‍य व्‍यक्‍तीमत्त्व !

श्री. नागेश गाडे

अगदी जवाएवढे दिले, तरी देणारा ते ओरडून सर्वांना सांगतो, ही आजच्‍या समाजाची रीत आहे. श्रेयवादाच्‍या या लोकेषणेत बेडेकरकाका २४ वर्षांत कधीच अडकले नाहीत. ते शांत आणि मृदूभाषी होते. त्‍यांच्‍या घरात साधकांचे सतत येणे-जाणे असायचे. ते साधकांशी इतके मिळूनमिसळून वागायचे की, नवख्‍या साधकालाही ‘बेडेकरकाका या वास्‍तूचे मालक आहेत’, याची जाणीव होत नसे. मालक असूनही ते त्‍यांच्‍या वास्‍तूत ‘साधक’ म्‍हणूनच वावरले. येणार्‍या-जाणार्‍या सर्वांची प्रेमाने मृदूभाषेत विचारपूस करून काकांनी सर्वच साधकांना प्रेमात बांधून ठेवले होते.’

– श्री. नागेश गाडे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के), समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह. (१६.४.२०२३)

‘मोहन बेडेकर यांच्‍या मृत्‍यूनंतरही ‘सनातन प्रभात’चा ‘बटर पेपर’ त्‍यांच्‍या घरातून निघणे’, याची इतिहासात नोंद होईल !

‘८.४.२०२३ या दिवशी सकाळी ११.३० वाजता बेडेकरकाका यांचे देहावसान झाले. त्‍यानंतर दुपारी ४.३० वाजता त्‍यांच्‍या पार्थिव देहावर अंत्‍यसंस्‍कार झाले. सामान्‍यतः कर्त्‍या पुरुषाच्‍या मृत्‍यूनंतर घरातील वातावरण शोकाकुल असते. काकांचे देहावसान झाले, त्‍या दिवशीही त्‍यांच्‍या घरातून ‘सनातन प्रभात’चा ‘बटर पेपर’ निघाला. आयुष्‍यातील एवढ्या कठीण प्रसंगीही श्रीमती मंजिरी बेडेकरकाकूंनी मागील २४ वर्षे या वास्‍तूत चालू असलेल्‍या ‘सनातन प्रभात’च्‍या कार्यात खंड पडू दिला नाही. ‘धर्मकार्याप्रतीची बांधीलकी किती अत्‍युच्‍च असू शकते !’, याचा आदर्श काकांच्‍या पश्‍चात बेडेकरकाकू आणि अन्‍य कुटुंबीय यांनी घालून दिला.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे संस्‍थापक संपादक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्‍हणाले होते, ‘‘साधकांच्‍या तन, मन आणि धन यांच्‍या त्‍यागामुळे चालू असलेले एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात !’’ त्‍यांचे हे वाक्‍य बेडेकर कुटुंबियांनी कृतीतून खरे करून दाखवले ! भविष्‍यात ‘सनातन प्रभात’चा इतिहास लिहिला जाईल. त्‍यात बेडेकर कुटुंबियांच्‍या या निरपेक्ष कार्याची नोंद नक्‍कीच घेतली जाईल. असा त्‍याग करणारे बेडेकर कुटुंब हीच ‘सनातन प्रभात’ची शक्‍ती होय !’

– श्री. नागेश गाडे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के), समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह. (१६.४.२०२३)