कुठलीही व्यक्ती, समाज किंवा देश यांच्यासाठी इतिहास हे एक बलस्थान असते. या इतिहासातून स्फुरण घेऊन वर्तमान उजळवणे अपेक्षित असते. इतिहासातून प्रेरणा घेऊनच पुढची पिढी निर्माण होते. भारताचा इतिहास जाज्वल्य आणि प्रेरणादायी आहे. तथापि जुलमी ब्रिटिशांनी हा इतिहास त्यांच्या राजवटीत पुढील पिढ्यांपर्यंत पोचू न देण्याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच त्यांनी भारतियांमध्ये क्षात्रतेज जागवणार्या अनेक वस्तू भारतातून चोरून नेल्या. त्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘भवानी तलवार’ आणि ‘वाघनखे’ या वस्तू होत. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत आपण हा अमूल्य ठेवा आजपावेतो परत आणू शकलेलो नाही.
आता ब्रिटनने भारतातून चोरून नेलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जगदंबा तलवार’ आणि ‘वाघनखे’ भारतात आणण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केल्या आहेत. त्यासाठी ब्रिटीश उपउच्चायुक्त ॲलॅन गॅम्मेल यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ब्रिटीश सरकारच्या वतीने या वस्तू भारताला परत करण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला गेल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त ‘जगदंबा तलवार’ आणि ‘वाघनखे’ महाराष्ट्र शासनाकडे सुपुर्द करण्यात येतील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यांनी अफझलखानाचा बाहेर काढलेला कोथळा, अनेक बलाढ्य मोगल राजांची उडवलेली धूळधाण, पाच पातशाह्यांचा केलेला नायनाट आदी सर्व हिंदूंमध्ये क्षात्रतेजाचे स्फुलिंग चेतवणारे आहे. हे सर्व त्यांनी ज्या शस्त्रांनी साध्य केले, ती शस्त्रे पहायला मिळणे, ही प्रत्येक शिवप्रेमीसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. हा अमूल्य ठेवा पहाताच सर्वसामान्यांना अन्याय, जुलूम यांविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा मिळेल. त्यांच्यातील राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान आपोआपच वृद्धींगत होतील. असे सजग समाजमन हे राष्ट्रासाठी जमेची बाजू ठरते. त्यामुळे ‘सरकारने हा ठेवा आणण्याची केलेली घोषणा लवकरात लवकर प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठीही पावले उचलावीत’, अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !