सुदानमध्ये सैन्यदल आणि निमलष्करी दल यांच्यातील मतभेदांमुळे झालेल्या हिंसाचारात १०० नागरिक ठार !

निमलष्करी दलाकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थी करण्याचे आवाहन !

खारटूम (सुदान) – उत्तर आफ्रिकी देश सुदानचे सैन्यदल आणि निमलष्करी दल यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले असून देश हिंसेच्या विळख्यात सापडला आहे. सलग ३ दिवस राजधानी खारटूम येथील रिपब्लिकन पॅलेस, सैन्याची मुख्य इमारत, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हिंसाचार चालू असल्याची माहिती ‘बीबीसी’ने प्रसारित केली आहे. यात आतापर्यंत १०० नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.

१. १५ एप्रिल या दिवशी येथील डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्यानंतर हिंसाचार उसळला.

२. ‘सुदान टीव्ही’ ही देशातील सरकारी वृत्तवाहिनी आणि तेथील आकाशवाणी १६ एप्रिलपासून बंद आहेत. स्थानिक वृत्त संकेतस्थळाने दावा केला आहे की, आकाशवाणीच्या नियंत्रण कक्षावर बाँबद्वारे आक्रमण करण्यात आले आहे.

३. सैन्यदलप्रमुख जन. अब्देल फत्ताह अल्-बुरहान यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असल्याचा दावा ‘रॅपिड स्पेशल फोर्सेस’ या निमलष्करी दलाचे प्रमुख जन. महंमद हामदान डगलो यांनी केला असून त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थी करण्याचे आवाहन ट्वीटद्वारे केले आहे. डगलो यांचे म्हणणे आहे की, त्यांचे सैनिक कट्टरतावादी मुसलमानांच्या विरोधात लढत असून लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असे असले, तरी डगलो यांनी खालच्या थराला जाऊन अल्-बुरहान यांना ‘कुत्रा’ आणि ‘गुन्हेगार’ संबोधले आहे.

४. दुसरीकडे अल्-बुरहान म्हणाले की, ‘रॅपिड स्पेशल फोर्सेस’ बरखास्त झाल्याविना आमचे सैन्य कारवाया थांबणार नाहीत.