अतिक अहमद याच्यासह उत्तरप्रदेशातील १८३ चकमकींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

नवी देहली – उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या पोलिसांच्या कह्यात असतांना झालेल्या हत्येच्या प्रकरणी अधिवक्ता विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. यासमवेत वर्ष २०१७ पासून उत्तरप्रदेशामध्ये झालेल्या १८३ चकमकींच्या अन्वेषणाचीही मागणी करण्यात आली आहे. यासह गुंड विकास दुबे याच्या झालेल्या चकमकीची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिवक्ता तिवारी यांनी यात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या कारवाया या लोकशाही आणि शासन यांच्यासाठी गंभीर धोका आहे. अशा प्रकारची कृत्ये अराजकता आहे. न्यायबाह्य हत्या किंवा कायद्यान्वये खोट्या पोलीस चकमकी यांचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात यावा. लोकशाहीत पोलिसांना अंतिम न्यायाधीश किंवा शिक्षा देणारा अधिकारी म्हणून अनुमती दिली जाऊ शकत नाही. शिक्षा करण्याचा अधिकार केवळ न्यायपालिकेकडे आहे. पोलीस जेव्हा धाडसी बनतात, तेव्हा संपूर्ण कायद्याचे राज्य कोलमडून जाते आणि लोकांच्या मनात पोलिसांविषयी भीती निर्माण होते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून त्यामुळे आणखी गुन्हे घडतात.