भारतीय दृष्टीकोनातून शिक्षणपद्धत अस्तित्वात आणणे, हे सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य !

उत्तरप्रदेश शासनाच्या पाठ्यपुस्तकांतून मोगलांचा इतिहास हद्दपार !

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली; पण अजूनही आपल्या देशात शिक्षणव्यवस्था आपण आपल्या दृष्टीकोनातून चालू करू शकलो नाही. आता परिस्थिती पालटत चालली आहे. आपण आता गुलामगिरीची मानसिकता दूर करू लागलो आहोत. आपल्या सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात पालट होत चालला आहे. त्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत. उत्तरप्रदेश शासनाने शिक्षण क्षेत्रात पालट घडवण्यास आरंभ केला आहे. ही अभिमान वाटावी, अशी गोष्ट आहे; परंतु पाठ्यपुस्तकांतून मोगलांचा इतिहास हद्दपार करण्यावर थांबता कामा नये. इतर अशा अनेक घटनांचाही या निमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरावे.

१. ब्रिटिशांनी निर्मिलेली शिक्षणव्यवस्था हिंदुस्थानच्या ख्रिस्तीकरणासाठी !

श्री. दुर्गेश परुळकर

वर्षानुवर्षे पाठ्यपुस्तकातून इस्लामी आक्रमकांचे गुणवर्णन केले जात होते. त्यांचे क्रौर्य आणि अमानवीय कृत्य यांकडे दुर्लक्ष करून त्यांचे उदात्तीकरण करण्यात आले होते. आता मात्र उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या निर्णयामुळे या उदात्तीकरणाला चाप बसला आहे. ब्रिटिशांनी टी.बी. मेकॉले याच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानातील शिक्षणव्यवस्था आमूलाग्र पालटली आणि हिंदु संस्कृतीचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने नवी शिक्षणव्यवस्था अस्तित्वात आणली. ही शिक्षणव्यवस्था हिंदुस्थानचे ख्रिस्तीकरण करण्याच्या हेतूने करण्यात आली होती, हे लक्षात घ्यायला हवे. मेकॉलेने मॅक्सम्युलरला हाताशी धरून वेद भ्रष्ट केले. मॅक्सम्युलरने त्याच्या मुलाला पत्रातून कळवले, संपूर्ण विश्‍वात जे धर्मग्रंथ आहेत, त्यात पहिला क्रमांक न्यू टेस्टामेंट बायबलचा आहे. नीतीच्या दृष्टीने दुसरा क्रमांक कुराण, तिसर्‍या क्रमांकावर ओल्ड टेस्टामेंट, बौद्ध त्रिपीटकांचा चौथा क्रम लागतो, तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे ला-आतसे अन् कन्फ्युशिअस येतात. शेवटच्या क्रमांकावर वेद आणि अवेस्ता येतात.

२. शिक्षणपद्धतीत कोणत्या गोष्टींचा समावेश करणे नितांत आवश्यक ?

देश स्वतंत्र झाल्यानंतर या सर्व गोष्टी नष्ट करून भारतीय दृष्टीकोनातून शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळे परकीय शिक्षण पद्धतीवर आधारितच शिक्षणव्यवस्था गेली ७५ वर्षे आपल्या देशात राबवली गेली. ती शिक्षणव्यवस्था विसर्जित करण्याच्या हेतूने उत्तरप्रदेश शासनाचा निर्णय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे; पण केवळ एवढेच करणे पुरेसे नाही. परकीय आक्रमकांनी जसा हिंदुस्थानचा राजकीय इतिहास भ्रष्ट केला, त्याचप्रमाणे हिंदुस्थानचा सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रांतील इतिहास भ्रष्ट केला आहे. अनेक गोष्टी दडपल्या आहेत. आपला हा शैक्षणिक, वैज्ञानिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या हेतूने आपल्या शिक्षणपद्धतीत त्यांचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे, म्हणजेच भारतीय दृष्टीकोनातून शिक्षणपद्धत अस्तित्वात आणणे, हे आपले सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य ठरते.

३. हिंदु कालगणनेचा पाठ्यपुस्तकांत समावेश हवा !

हिंदूंची कालगणना अत्यंत शास्त्रशुद्ध आणि अचूक आहे. सृष्टीच्या कालचक्राप्रमाणे म्हणजेच पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर आधारित आपले पंचांग निर्माण करण्यात आले आहे. अशी कालगणना जगातील कोणत्याही संस्कृतीत आढळत नाही. आपल्या कालगणनेत शुक्ल आणि कृष्ण पक्ष अशा २ पक्षांचा एक मास होतो. पृथ्वी प्रदक्षिणा करतांना चंद्राचा १२ अंशातील होणारा प्रवास म्हणजे एक तिथी होय. याच पहिल्या तिथीला प्रतिपदा संबोधले जाते. अमावास्येला चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असतो. अशी जी स्थिती आकाशात असते, त्या स्थितीला शून्य अंश म्हणतात. तिथून १२ अंशाच्या गतीने चंद्र फिरतो. तो जेव्हा १८० अंशातून प्रवास करतो, त्या वेळी जी तिथी येते, तिला पौर्णिमा म्हणतात. अशा प्रकारे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालखंडाला शुक्ल पक्ष म्हणतात. त्यानंतरच्या प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतच्या १५ दिवसांच्या कालखंडाला कृष्ण पक्ष म्हणतात. इंग्रजांच्या कॅलेंडरप्रमाणे प्रत्येक मासाच्या कोणत्या दिनांकाला पौर्णिमा आणि अमावस्या येते, हे सांगता येत नाही; कारण त्यांची कालगणना चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या भ्रमणावर अवलंबून नाही, म्हणजेच ती शास्त्रशुद्ध नाही. हे ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या शिक्षणव्यवस्थेमुळे सांगता आले नाही; पण हे आपल्याला भारतीय दृष्टीकोनातून शिक्षणव्यवस्था अस्तित्वात आल्यावर सहजपणे सांगता येईल.

त्याचप्रमाणे इंग्रजी कालमापन पद्धत आपल्या देशातून हद्दपार करावी लागेल. इंग्रजी कॅलेंडरमध्ये असलेली मासांची (महिन्यांची) नावे ग्रह गोलांच्या आणि नक्षत्रांच्या भ्रमणानुसार नाहीत, म्हणजेच त्यांचे कालमापन सृष्टीचक्रानुसार सिद्ध करण्यात आलेले नाही. कालगणनेसाठी आकाशातील २७ नक्षत्रांमध्ये प्रत्येक नक्षत्राचे ४ भाग केले आहेत. अशा प्रकारे एकूण २७ नक्षत्रांचे १०८ भाग होतात. त्यापैकी ९ भागांच्या एका आकृतीनुसार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्‍चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा १२ राशींची नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. आपल्या कालगणनेनुसार आपल्या मासांची नावे नक्षत्रांवरून ठेवण्यात आली आहेत, म्हणजेच नक्षत्रांच्या नावावरून चांद्रमास ओळखला जातो. चित्रा नक्षत्रावरून चैत्र, विशाखा नक्षत्रावरून वैशाख, ज्येष्ठा नक्षत्रावरून ज्येष्ठ, पूर्वाषाढा नक्षत्रावरून आषाढ, श्रवण नक्षत्रावरून श्रावण, पूर्वा भाद्रपदा नक्षत्रावरून भाद्रपद, अश्‍विनी नक्षत्रावरून अश्‍विन, कृतिका नक्षत्रावरून कार्तिक, मृग नक्षत्रावरून मार्गशीर्ष, पुष्य नक्षत्रावरून पौष, मघा नक्षत्रावरून माघ आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावरून फाल्गुन असे १२ मास आपल्या एका वर्षात येतात.

हे निसर्गचक्रावर आधारित असलेले कालमापन जगातील कोणत्याही देशात आढळत नाही; पण या कालमापनाकडे स्वतःला विज्ञानवादी म्हणणार्‍या जगाने दुर्लक्ष करून त्यांचे अशास्त्रीय कालमापन आपल्यावर लादले. मोगलांचा इतिहास जसा आपण पाठ्यपुस्तकांतून काढला, तसे पाश्‍चात्त्यांचे कालमापन बाजूला सारून आपण निसर्गचक्रावर आधारित असलेले हिंदु कालमापन स्वीकारणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण जगाला या कालमापनाचा परिचय करून देणे आपल्याला सहज शक्य होईल. शिक्षणव्यवस्थेमध्ये ही एक वैज्ञानिक दृष्टी आपल्यालाही आपल्या शिक्षणव्यवस्थेत आणण्यासाठी आता मार्ग खुला झाला आहे.

४. सध्याच्या शिक्षणपद्धतीत वैदिक गणित आणि भारतीय संशोधकांच्या नावाचा समावेश आवश्यक !

आपल्या शिक्षणपद्धतीत वैदिक गणिताचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे. पुरीचे शंकराचार्य, भारतीकृष्ण यांनी अथकपणे ८ वर्षे संशोधन करून एक गणितपद्धत शोधून काढली. या पद्धतीला त्यांनी अश्रुविना गणित, असे नाव दिले; कारण गणित हा विषय तसा अनेकांना आकलन न होणारा विषय आहे. आपल्याला त्यात एक प्रकारचा कोरडेपणा वाटतो; पण त्यांनी शोधून काढलेली गणितपद्धत ही आनंद देणारी आहे. गणित हा विषय शिकतांना कुणालाही कंटाळा येणार नाही. या गणित पद्धतीत १६ प्रमुख आणि १३ उपसूत्रे आहेत. त्याचे अध्ययन केले की, १० प्रकारची गणिते, अंकगणित, बीजगणित, गोलीय त्रिकोणमिती, घन भूमिती, समाकल, अवकलन अशा प्रकारच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे चटकन सहज काढता येतात.

पायथागोरसचा सिद्धांत आपण सगळेच शाळेत शिकलो. वास्तविक हा सिद्धांत पायथागोरसचा नसून बोधायन यांचा आहे. हे आपल्याला पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीमुळे कळू शकले नाही. कल्पसूत्र ग्रंथाच्या अनेक अध्यायांमधील एका अध्यायात शुल्वसूत्रांचा एक अध्याय आहे. वेदीचे मापन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या दोरीला रज्जू किंवा शुल्व म्हणतात. म्हणून भूमिती हा विषय शुल्वसूत्रात समाविष्ट केला गेला आहे. त्यामध्ये बोधायनऋषींचे बोधायन प्रमेय देण्यात आले आहे. ते असे…

दीर्घचतुरस्रस्याक्ष्णयारज्जु: पार्श्‍वमानी
तिर्यङ्मानी च यत् पृथग्भूते कुरुतस्तदुभयं करोति ।

 बौधायन शुल्वसूत्र, अध्याय १, खंड १, सूत्र ४८

अर्थ : आयताच्या अक्ष्णया रज्जूवरील (कर्ण) चौरसाचे क्षेत्रफळ पार्श्‍वमानी (उभी बाजू) आणि तिर्यङ्मानी (आडवी बाजू) यांच्यावरील वेगवेगळ्या चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतके असते, म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ त्याच त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंवरील चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बेरजेएवढे असते.

बोधायन यांनी शुल्वसूत्रात हा सिद्धांत दिला आहे. ग्रीक गणिततज्ञ पायथागोरसच्या पूर्वी किमान १ सहस्र वर्षे बोधायन यांनी हे प्रमेय सिद्ध केले होते. पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीमुळे आपल्याला बोधायनऋषींचे साधे नावही सांगण्यात आले नाही. ज्याप्रमाणे पाठ्यपुस्तकातून मोगलांचा इतिहास काढण्यात आला, त्याप्रमाणे पाश्‍चात्त्यांची नावे काढून हिंदु कालमापन, वैदिक गणितपद्धत आणि आपल्या संशोधकांची नावे पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे क्रमप्राप्त आहे. अलेक्झांडर जगज्जेता नाही, हेसुद्धा पाठ्यपुस्तकातून सांगता आले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्लास्टिक सर्जरी ही हिंदुस्थानने जगाला दिलेली देणगी आहे, असे डॉ. कार्प्युसह अनेक पाश्‍चात्त्य चिकित्सकांनी मान्य केले असल्याचे जे दडवून ठेवले, ते आता विद्यार्थ्यांना सांगता आले पाहिजे.

५. पूर्वजांविषयी आदर बाळगायला शिकवणारी शिक्षणपद्धत हवी !

देवीची लस शोधून काढणार्‍या डॉ. जेन्नर यांच्यापूर्वी अनुमाने २०० वर्षे आधी आपल्या येथेही लसीकरण केले जात होते, हे पाठ्यपुस्तकातून सांगितले गेले पाहिजे. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी हिंदुस्थानात आला; पण त्याला हिंदुस्थानात आणणारा येथील चंदन नावाचा एक गुजराती व्यापारी होता. या व्यापार्‍याचे जहाज वास्को द गामाच्या जहाजापेक्षा तिप्पट मोठे होते, ही गोष्ट वास्को द गामाने त्याच्या डायरीत नोंदवल्याचेही पाठ्यपुस्तकातून सांगितले पाहिजे.

वर्ष १८११ मध्ये कर्नल वॉकर यांनी आकडेवारी देऊन सिद्ध केले की, भारतीय जहाजांच्या निर्मितीसाठी येणारा व्यय पुष्कळ न्यून असतो. भारतीय बनावटीची जहाजे मजबूत असतात. ब्रिटीश दलामध्ये फक्त भारतीय जहाजे वापरली, तर व्यय पुष्कळ न्यून होईल. त्यामुळे इंग्रजांनी तात्काळ भारतीय जहाजनिर्मितीला आळा घालण्यासाठी कायदा करून येथील जहाजनिर्मिती बंद केली. याविषयी सर विल्यम डिग्वी याने लिहिले, पाश्‍चात्त्य जगाच्या राणीने प्राच्यसागराच्या राणीचा वध केला. ही गोष्टसुद्धा पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे नितांत आवश्यक आहे, अशी शिक्षणपद्धत हिंदुस्थानात अस्तित्वात आली की, आपल्या उगवत्या पिढीला आपल्या पूर्वजांविषयी आदर वाटेल. तसेच परकीय आक्रमकांचा कुटील डाव लक्षात येईल.

६. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून सत्य गोष्टी सांगण्याचा संकल्प करणे आवश्यक !

परिणामी आपली खरी ओळख उगवत्या पिढीला सहज करून देता येईल. अशा शिक्षणपद्धतीमुळे गुलामी मानसिकता नष्ट होऊन आपल्या वैज्ञानिक परंपरेचा अभिमान वाटेल. मनातील सर्व न्यूनगंड निघून जाईल. परकीय भाषांपेक्षा स्वकीय भाषेवरील प्रेम जागृत होईल. इंग्रजी भाषा येत नाही, याची लाज वाटण्याऐवजी संस्कृत भाषा आपल्याला येत नाही, याची लाज वाटेल. संस्कृत हीच सर्व भाषांची जननी आहे, हे सत्य नव्या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना सांगता येईल. मोगलांचा इतिहास जसा काढला, तसा सर्व क्षेत्रांत घुसडण्यात आलेल्या असत्य गोष्टी काढून सत्य गोष्टी पाठ्यपुस्तकातून सांगण्याचा संकल्प आता आपण केला पाहिजे. केवळ मोगलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून काढून उपयोग नाही, ही गोष्टसुद्धा आपण ध्यानात घेतली पाहिजे.

–  श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (८.४.२०२३)

परकीय शिक्षणपद्धतीवर आधारित भारतातील शिक्षणपद्धत विसर्जित करून हिंदु संस्कृतीवर आधारित शिक्षणपद्धत विकसित करा !