‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’कडून आंदोलनाची चेतावणी, तर पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव !

भिवंडी येथील वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीच्या नियुक्तीचे प्रकरण

ठाणे – भिवंडी येथील ऐतिहासिक श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवी संस्थानच्या पर्यवेक्षकपदी (‘सुपरवायझर’ पदी) फ्रान्सिस जोसेफ लेमोस या ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. ही निवड तात्काळ रहित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी ‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’कडून देण्यात आली; मात्र यामुळे धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होण्याचा बागुलबुवा निर्माण करून पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘पर्यवेक्षकपदी फ्रान्सिस जोसेफ लेमोस यांची नियुक्ती करण्याचा निर्णय १५ एप्रिलपर्यंत रहित न केल्यास २३ एप्रिल या दिवशी मंदिराच्या प्रांगणात आंदोलन करू’, अशी चेतावणी शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने वज्रेश्‍वरी देवस्थानला देण्यात आली आहे. याविषयी शंभुदर्ग प्रतिष्ठानकडून देवस्थानला पत्र पाठवण्यात आले आहे. मंदिरात येणारे देणगीदार, अतीमहत्त्वाच्या व्यक्ती आणि शासकीय अधिकारी यांचे स्वागत अन् पाहुणचार करणे, न्यायालयीन कामे करणे, देवस्थानच्या भूमींची पहाणी करणे, मंदिराच्या व्यवस्थापकांना सहकार्य करणे आदी दायित्व फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

फ्रान्सिस लेमोस हे देवस्थानच्या वतीने करतात लाडूंची विक्री !

मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने प्रसाद म्हणून लाडूंची विक्री केली जाते. फ्रान्सिस लेमोस हे मागील ३० वर्षांपासून येथील देवस्थानच्या दुकानामध्ये लाडूंची विक्री करत आहेत. ते इतकी वर्षे काम करत असल्यामुळे त्यांना मंदिरामध्ये पर्यवेक्षकपदी नेमण्यात येत असल्याची माहिती एका विश्‍वस्तांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची निवड करणे, हे नवे धर्मसंकट ! – शंभुदुर्ग प्रतिष्ठान

शंभुदुर्ग प्रतिष्ठानने वज्रेश्‍वरी देवस्थानला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे, ‘‘ठाणे जिल्ह्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आदिवासी वस्त्यांमध्ये प्रार्थनास्थळे उभारून लोकांशी संपर्क वाढवला आहे. त्यांच्या संपर्कात येणारे हिंदु बांधव कालांतराने हिंदु धर्माला मानत नाहीत, तर काही लोक हिंदु धर्माचा त्यागही करत असल्याचे आढळून आले आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रयत्नरत आहेत. असे असतांना वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची निवड करणे, हा हिंदु धर्मावर आणखी संकटे ओढवणारा निर्णय आहे.’’

जनक्षोभ असेल, तर फ्रान्सिस यांना पदावरून हटवू ! – अधिवक्ता पाटकर, विश्‍वस्त, श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवी संस्थान

फ्रान्सिस जोसेफ लेमोस हे मागील ३० वर्षांपासून मंदिराच्या बाहेर देवस्थानकडून लाडू विक्रीचे काम करत आहेत. त्यांच्या पर्यवक्षेकपदीा नियुक्तीविरोधात जनक्षोभ असेल, तर आम्ही त्यांना पदावरून हटवू; मात्र असे करणे योग्य होणार नाही. याविषयी अद्याप विश्‍वस्तांची बैठक झालेली नाही. त्यांची नियुक्ती रहित करण्याचा निर्णय विश्‍वस्तांच्या बैठकीत घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया वज्रेश्‍वरी देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता पाटकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दबाव (म्हणे) ‘या प्रकरणात पडू नका !’- पोलिसांचा कार्यकर्त्यांना दूरभाष

‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’च्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी दूरभाष करून ‘या प्रकरणात पडू नका’, असे सांगितले. (ही पोलिसांची धमकी समजायची का ? असे पोलिसांनी अन्य पंथियांना सांगायचे धाडस दाखवले असते का ? – संपादक)

१३ एप्रिलला भिवंडी येथील गणेशपुरी पोलीस ठाण्यात हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून पोलिसांनी दमदाटी केली. कार्यकर्ते विश्वस्तांना निवेदन देणार होते; मात्र तेथे न जाण्यासाठी  पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दबाव आणला. कार्यकर्ते श्री. श्रीकांत गोणे यांना पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्यास उत्तरदायी धरण्यात येण्याविषयी नोटीस पाठवली आहे.  ‘ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती पर्यवेक्षकपदी केली जाऊ नये,  यासाठी आम्ही विश्वस्तांना निवेदन देणार होतो. हे सर्व सनदशीर मार्गाने होत असतांना पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दबाव आणणे हे लोकशाहीला धरून नाही’, अशी प्रतिक्रिया हिंदु राष्ट्र सेनेचे ठाणे जिल्हा प्रचारक श्री. आदित्य देशमुख यांनी दैनिक ‘सनातन
प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

  • ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना ख्रिस्ती व्यक्तीची मंदिराच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती धर्मप्रेमी हिंदूंनी ‘सर्वधर्म समभावा’च्या नावाखाली का सहन करावी ?
  • कधी चर्च किंवा मशीद यांच्या प्रमुखपदी हिंदु व्यक्तीची निवड केली जाते का ? मग हिंदूंच्या मंदिरात अन्य पंथियांची नियुक्ती कशासाठी ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच ते अशी कृती करतात !
  • धर्महानी रोखण्यासाठी समस्त हिंदूंनी हिंदुऐक्याची वज्रमूठ निर्माण करणे आवश्यक !