ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
दोडामार्ग – तालुक्यातील सासोली ग्रामस्थांच्या भूमी एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाकडून हडप करण्याचा प्रकार उघड झाला आहे. या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी १० एप्रिल या दिवशी येथील तहसीलदार कार्यायालसमोर अनिश्चित काळासाठी उपोषण चालू केले आहे. ‘या प्रकाराची तात्काळ नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.
(सौजन्य : Kokan Live Breaking)
ते म्हणाले,
‘‘सासोली गावामध्ये मोठ्या क्षेत्रावर अवैधपणे वृक्षतोड चालू आहे. ७/१२ सामायिक असतांना, तसेच ७/१२ वरील व्यक्तींचे हक्क असतांनाही त्या ठिकाणी खरेदीखत करून भूमी दुसर्याच्या कह्यात देण्यात आली आहे. हे काम पूर्णत: अवैधरित्या करण्यात आले आहे. याचा अहवाल तहसीलदारांनी सादर करावा आणि ज्या भागांमध्ये जे चुकीचे काम चालू आहे, ते करणार्यांवर कारवाई करावी. संबंधित भूमीच्या ७/१२ वर स्थानिक ग्रामस्थांची नावे असून त्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्जाचा ७ कोटी ३५ लाख रुपयांचा बोजा (कर्ज घेण्यासाठी तारण ठेवल्याची नोंद ७/१२ वर असणे) चढवण्यात आला आहे.’’
‘येथे झालेल्या नियमबाह्य कामांत ज्यांचा सहभाग आहे, त्या महसूल आणि वनविभाग यांच्या अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.’’