‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला आणि बूट घालून अश्‍लील नृत्य !

  • सामाजिक माध्यमांतून हिंदूंचा विरोध

  • माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन् यांनी केली सेन्सॉर बोर्डाकडे निर्मात्यावर कारवाई करण्याची मागणी !

(डावीकडून) अभिनेता रामचरण, सलमान खान आणि वेंकटेश

मुंबई – ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि रामचरण नाचत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर त्याला हिंदूंकडून विरोध होऊ लागला आहे. हे नृत्य अश्‍लील आणि बीभत्स असल्यानेही याला विरोध केला जात आहे. सामाजिक माध्यमांतून माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन् आणि तमिळनाडूतील समीक्षक प्रशांत रंगास्वामी यांनी ट्वीट करून या गाण्याला विरोध केला आहे. ‘या चित्रपटाने दक्षिण भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद समजी आहेत. (फरहाद समजी अशा प्रकार मशिदीमध्ये अभिनेते नाचतांनाचे गाणे दिग्दर्शित करतील का ? अशी गाणी मंदिरांमध्येच का चित्रित केेली जातात ? – संपादक)

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

शिवरामकृष्णन् यांनी म्हटले की, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाच्या निर्मात्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे. मंदिरात चपला, बूट घालून नाचणे चुकीचे आहे. अभिनेत्यांनी घातलेली लुंगी ही लुंगी नसून धोतर आहे. एका सांस्कृतिक परिधानाला वाईट पद्धतीने दाखवण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहून प्रमाणपत्र देतांना हिंदूंच्या संदर्भातील अशा प्रकारच्या अवमानाच्या वेळी झोपलेले असते कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करते ?
  • केंद्रातील भाजप सरकारने याकडे आता गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. सातत्याने हिंदु धर्माचा चित्रपटांतून अवमान केला जातो आणि प्रत्येक वेळेला हिंदूंना त्याविरोधात आंदोलन करावे लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !