मुंबई – राज्यात सलग दुसर्या दिवशी अवेळी पावसामुळे शेतीपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस पडला. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्यामुळे घरांचीही हानी झाली. राज्यात अद्यापही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, बाभूळगाव तालुक्यांमध्ये वादळी पाऊस पडला. यामध्ये हरभरा, गहू, मिरची, कांदा, आंबा आणि भाजीपाला यांची हानी झाली. काढणीला आलेले गव्हाचे पीक पावसामुळे भूमीवर पडले. यवतमाळ जिल्ह्यात सलग दीड घंटे पाऊस पडला. नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. पारनेर, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा, नगर तालुक्यांमध्ये गहू, कांदा, हरभरा, कलिंगड, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे गारांच्या पावसामुळे कलिंगडांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी, औंढा या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे फळबागा आणि भाजीपाला, तसेच हळदीचे पीक यांची हानी झाली. कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडून आंबा बागायतदारांची हानी झाली. काजू, कोकम, जांभूळ आदी फळपिकांनाही पावसाचा फटका बसला.