पुणे येथे प्रवाशांना लुबाडणार्‍या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह ६ कर्मचार्‍यांचे निलंबन !

पुणे – येथील रेल्वेस्थानकावर साहित्य पडताळणीच्या नावाखाली प्रवाशांना लुबाडणार्‍या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह ६ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित कर्मचार्‍यांपैकी एकावर यापूर्वीही प्रवाशांचे साहित्य पडताळणीत अपप्रकार केल्यामुळे चोरीचा गुन्हा नोंद होता. तरीही त्यांची पुन्हा रेल्वे स्थानकात नियुक्ती केल्याचे समोर आले. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

१. पुणे रेल्वेस्थानकावर घातपाती कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर या कर्मचार्‍यांकडे प्रवाशाचे साहित्य पडताळण्याचे काम होते. त्यांनी ३ एप्रिल या दिवशी एका तरुणासह त्याच्या मैत्रिणीला अडवले. त्यांच्या बॅगेत गांजा असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी केली. या दोघांना लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसमोर उपस्थित केले. त्याची ‘स्टेशन डायरीत’ नोंद करून सायंकाळी सोडून दिले.

२. लोहमार्ग पोलिसांनी तरुण आणि त्याच्या मैत्रिणीकडून ५ लाख रुपये घेतले, अशी माहिती मुंबईच्या लोहमार्ग पोलीस महासंचालक कार्यालयातून लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांना कळवण्यात आली. त्यानुसार रेल्वे फलाटावरील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण पडताळण्यात आले.

३. पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना ‘त्यांचे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत ?’, ‘निलंबित कर्मचार्‍यांची नावे काय ?’, याविषयी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

४. जून २०२१ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अपप्रकार केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांसह ७ पोलिसांना बडतर्फ केले होते. या घटनेवरून प्रवाशांना लुबाडण्याचे काम चालूच असल्याचे समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

असे भ्रष्ट आणि लोभी पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ? यासाठी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल !