भक्तशिरोमणी महाबली हनुमान !

‘श्रीरामाचे स्मरण होताच रामभक्त हनुमानाचीही आठवण येते आणि हनुमानाचे स्मरण होताच डोळ्यांपुढे प्रभु श्रीरामांचे मुखमंडल येते. प्रभु श्रीराम आणि हनुमान हे भक्त अन् भगवंत यांच्या पवित्र नात्याचे सर्वाेत्कृष्ट उदाहरण आहेत. ३.४.२०१४ या दिवशी मला प्रभु श्रीराम आणि परमभक्त हनुमान यांच्या प्रथम भेटीचे सूक्ष्म दृश्य दिसले अन् देवाच्या कृपेने त्यांचे चित्र रेखाटले गेले. (हे चित्र बाजूला दिले आहे.) तेव्हा मी भावविभोर होऊन चित्र काढत असतांना ‘हरि आणि हर यांचे पाहुनी मीलन । तृप्त झाले लक्ष्मणाचे अंत:करण ।। ’, या दोन ओळी सुचल्या होत्या. आता संगणकावर त्या ओळींचे टंकलेखन करत असतांना मला देवाच्या कृपेने ६ कडव्यांची पुढील कविता स्फुरली. ही कविता प्रभु श्रीराम आणि परमभक्त हनुमान यांच्या पावन चरणी भावपुष्पांच्या रूपाने अर्पण करत आहे.

कु. मधुरा भोसले

रामभक्तीत होऊन तल्लीन । नित्य करत असे रामाचे स्मरण ।।

हनुमंत झाला रामभक्तीत मग्न ।। राममय झाले होते त्याचे जीवन ।। १ ।।

काशाय (टीप १) वस्त्र करूनी धारण । ऋष्यमुखाजवळ (टीप २) आले रामलक्ष्मण ।।

वनात करत होते विचरण । सीतेला शोधत होते रामलक्ष्मण ।। २ ।।

रामरूपाचे घेऊनी दर्शन । धन्य झाले हनुमानाचे लोचन ।।

पाहूनी प्रभूंचे सुकोमल चरण । सजल झाले हनुमानाचे नयन  ।। ३ ।।

हनुमानाची प्रतीक्षा झाली पूर्ण । श्रीरामाने दिले प्रत्यक्ष दर्शन ।।

भावभक्तीने दाटले अंत:करण । भावाश्रूंनी धुतले श्रीरामाचे पावन चरण  ।। ४ ।।

 शिवरूपी हनुमानाला भेटले रामरूपी श्रीनारायण । हा सोहळा पहाती रामभक्त लक्ष्मण ।।

हरि आणि हर यांचे पाहुनी मीलन । तृप्त झाले लक्ष्मणाचे अंत:करण  ।। ५ ।।

 रामभक्तीने लाभले मोक्षस्थान । असा हा चिरंजीव हनुमान असे भाग्यवान ।।

परमबलशाली कृपासिंधु दयावान । भक्तशिरोमणी महाबली हनुमान ।। ६ ।।

टीप १ – भगवे

टीप २ – ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी हनुमानाला प्रभु श्रीराम प्रथम भेटले होते.

प्रार्थना : ‘ हे प्रभु श्रीराम, आम्हा साधकांमध्ये तुझ्या परमप्रिय भक्त हनुमानाप्रमाणे दास्यभक्ती निर्माण होऊन आमचे अंत:करण शुद्ध होऊन ते राममय होऊ दे’, अशी तुझ्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२३)